वयाच्या ६ व्या वर्षी दृष्टी गमावली, पण जिद्द सोडली नाही! इचलकरंजीच्या सुप्रिया काटकर यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत इंग्रजी साहित्यात मिळवली पीएच.डी. पदवी!

संकटे माणसाचे आयुष्य कठीण करू शकतात, परंतु जर मनगटात जिद्द आणि आत्मविश्वासाची जोड असेल तर कोणतीही अपंगत्वाची बाधा यशाच्या मार्गात अडथळा ठरू शकत नाही, हे सिद्ध करून दाखवले आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील सुप्रिया काटकर (Supriya Katkar) या कर्तृत्ववान तरुणीने. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी एका दुर्दैवी आजारपणामुळे आपली दृष्टी पूर्णपणे गमावणाऱ्या सुप्रिया यांनी कधीही परिस्थितीसमोर नांगी टाकली नाही. अंधत्वाचे सावट आयुष्यावर आले तरी शिक्षणाची ओढ आणि काहीतरी करून दाखवण्याची महत्त्वाकांक्षा त्यांनी कधीही कमी होऊ दिली नाही.

आईची खंबीर साथ आणि शैक्षणिक प्रवास:

सुप्रिया यांच्या या खडतर आणि प्रेरणादायी प्रवासात त्यांच्या आईची भूमिका अत्यंत मोलाची ठरली. डोळ्यांची दृष्टी नसतानाही पुस्तकातील शब्द वाचून दाखवणे, अभ्यासक्रमाचे ऑडिओ रेकॉर्ड करणे आणि प्रत्येक टप्प्यावर खंबीरपणे पाठीशी उभे राहण्याचे काम त्यांच्या आईने केले. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर सुप्रिया यांनी उच्च शिक्षणात आपले लक्ष केंद्रित केले. कठीण मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET) आणि राज्य पात्रता परीक्षा (SET) या दोन्ही परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन करत त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवली.

इंग्रजी साहित्यात पीएच.डी. (Ph.D.) पदवीची मानकरी:

नेट-सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही सुप्रिया यांचे शैक्षणिक समाधान झाले नाही. त्यांनी इंग्रजी साहित्यात (English Literature) संशोधन करण्याचा निर्णय घेतला. अफाट मेहनत, वाचनाची आवड, मार्गदर्शकांचे सहकार्य आणि स्वतःच्या जिद्दीच्या बळावर त्यांनी इंग्रजी साहितyat यशस्वीरित्या पीएच.डी. (Ph.D.) पदवी संपादन केली आहे. त्यांच्या या ऐतिहासिक यशाने केवळ इचलकरंजी शहराचाच नव्हे तर संपूर्ण कोल्हापूर जिल्हा व महाराष्ट्राच्या मान उंचावला आहे. शारीरिक अपंगत्वावर मात कशी करावी आणि ध्येयाशी कशी प्रामाणिक राहावे, याचे एक ज्वलंत उदाहरण सुप्रिया काटकर यांनी संपूर्ण तरुण पिढीसमोर ठेवले आहे.

 

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *