गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!

गोवा: देशात अराजकता आणि अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष आणि इंडिया आघाडीकडून केला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. लोकशाहीसमोरील या संभाव्य धोक्यांपासून नागरिकांनी जागृत राहण्याची नितांत गरज असल्याचे सांगत, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 'लोकतंत्र बचाव, अराजकता हटाओ' अशी जोरदार हाक दिली आहे.

पणजी येथे भारतीय जनता पक्षातर्फे (भाजप) आयोजित 'लोकतंत्र बचाव, अराजकता हटाओ' पदयात्रेत मुख्यमंत्री बोलत होते. चर्च स्क्वेअर परिसर ते आझाद मैदान यांदरम्यान काढण्यात आलेल्या या भव्य पदयात्रेत केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, मंत्री विश्वजीत राणे, दिगंबर कामत, बाबूश मोन्सेरात, रोहन खवटे, नीळकंठ हळर्णकर, सुभाष शिरोडकर यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आणि पक्षाचे अन्य प्रमुख मंत्री, आमदार उपस्थित होते. या पदयात्रेमध्ये भाजपचे हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, देशास अस्थिर करण्यासाठी काही विरोधी घटकांकडून परदेशातून आर्थिक मदत मिळविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. केवळ 'लोकशाही वाचवा' अशी केवळ घोषणा करून चालत नाही, तर ती कृतीतून दाखवावी लागते; परंतु विरोधकांकडून तसे पाहायला मिळत नाही. काँग्रेस पक्ष सत्तेत असताना नेहमीच सामान्य जनतेला विसरतो, मात्र सत्तेतून पायउतार झाल्यावर त्यांना जनतेची प्रकर्षाने आठवण येते. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये (लोकसभा आणि राज्यसभा) विरोधकांकडून जाणीवपूर्वक कामकाज अडथळे आणण्याचे आणि विकासकामांमध्ये बाधा निर्माण करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला. विरोधकांना राजकीय मैदानात बाजूला सारून देशापुढील अडचणी दूर करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी आतापासूनच सज्ज राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

ईव्हीएमवरील संशयावरून विरोधकांवर टीका निवडणुकीत पराभव झाला की विरोधकांकडून थेट ईव्हीएम (EVM) मशीनवर संशय घेतला जातो, मात्र तेच जर निवडणुकीत विजयी झाले तर ते पूर्णपणे गप्प बसतात, अशी उपरोधिक टीका मुख्यमंत्र्यांनी केली. विरोधक नेहमी अशी मागणी करतात की मतदान नेहमी मतपेटीद्वारे घेतले जावे; परंतु गोव्यात नुकत्याच झालेल्या पालिका आणि पंचायत निवडणुका या मतपेटीद्वारेच पार पडल्या होत्या, तरीसुद्धा त्यात विरोधकांचा पराभवच झाला होता, असे त्यांनी स्पष्ट केले.

नेपाळ व जगातील इतर काही देशांमध्ये अलीकडच्या काळात घडलेल्या राजकीय घडामोडींचे उत्तम उदाहरण आपल्या समोर आहे. त्यामुळे लोकशाहीसमोरील संभाव्य धोक्यांबाबत देशातील सुजाण नागरिकांनी नेहमी सतर्क राहिले पाहिजे. भारत हा एकसंध आणि प्रखरपणे लोकशाही मानणारा देश असून, देशात कधीही जमावशाहीला स्थान असणार नाही, असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मागील १३ वर्षांच्या कालखंडात देशामध्ये पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ विकासाच्या क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती साध्य झाली आहे. भाजप सरकार आणि पंतप्रधान मोदी नेहमीच देशातील युवकांना प्रोत्साहन देतात. लोकशाहीचे खऱ्या अर्थाने संरक्षण आणि देशातील राजकीय स्थैर्य टिकवून ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य केवळ भाजपनेच केले आहे, असे कौतुक त्यांनी केले.

काँग्रेसच्या काळात १२ वेळा एसआयआर प्रक्रिया: दामू नाईक भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी कार्यक्रमात बोलताना सांगितले की, देशात काँग्रेस पक्षाच्या राजवटीत तब्बल १२ वेळा 'एसआयआर' (SIR) प्रक्रिया पार पडली होती. २००४ साली ती शेवटची झाली होती, त्यानंतर आता २०२५ मध्ये म्हणजेच जवळपास २ जीवनकाळानंतर (२१ वर्षानंतर) ती पुन्हा अंमलात आली. मात्र काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांकडून या प्रक्रियेवर विनाकारण संशय व्यक्त करत व्होट चोरीचे बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. काँग्रेसच्या काळातही जेव्हा एसआयआर प्रक्रिया झाली होती, तेव्हा हे नेते का गप्प बसले होते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

एसआयआरवरून राजकारण नको: मंत्री विश्वजीत राणे राज्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी विरोधकांवर कडक शब्दांत ताशेरे ओढत म्हटले की, काँग्रेस तसेच विरोधकांकडून 'एसआयआर'च्या विषयावर अनावश्यक राजकारण केले जात आहे. सर्वसामान्यांची दिशाभूल करण्यासाठी आणि त्यांचे मूळ मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठीच विरोधकांचे हे सर्व खटाटोप सुरू आहेत. एसआयआरच्या नावाखाली व्होट चोरीचा खोटा आरोप करणारे हेच विरोधक काँग्रेसशासित राज्यांमधील चालू असलेल्या एसआयआर प्रक्रियेवर मूग गिळून गप्प का आहेत? असा सज्जड सवाल त्यांनी विचारला.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *