जळगाव: गावी परतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत लग्नातील वादातून २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून; १५ संशयित पोलिसांच्या ताब्यात

जळगाव: तालुक्यातील बोरनार येथे लग्नसमारंभात झालेल्या वादातून अमळनेर येथून दोन दिवसांपूर्वीच गावी आलेल्या प्रेम गोपाल धनगर (वय २१) या तरुणावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी (१८ नोव्हेंबर २०२६) घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत १५ संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील बोरनार गावात प्रेम धनगर हा आपल्या आई-वडिलांसह वास्तव्यास होता. काही महिन्यांपासून तो कामानिमित्त अमळनेर येथे गेला होता. मात्र, दोन दिवसांपूर्वीच तो पुन्हा आपल्या गावी बोरनार येथे परतला होता. बुधवारी सायंकाळी गावात एका लग्नसमारंभाचे आयोजन करण्यात आले होते आणि या सोहळ्यासाठी प्रेम तिथे गेला होता.

लग्नसमारंभात उपस्थित असताना काही जणांसोबत प्रेमचा वाद झाला. सुरुवातीला झालेल्या शाब्दिक वादाचे काही वेळातच गंभीर स्वरूपात रूपांतर झाले. या वादानंतर सुमारे पंधरा ते वीस जणांच्या टोळक्याने प्रेमला मारहाण केली आणि जमावातील एकाने धारदार शस्त्राने त्याच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात प्रेम गंभीररीत्या जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, तसेच गिरीश पाटील, रामकृष्ण पाटील आणि त्यांचे सहकारी पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला आणि पुढील तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

गंभीर जखमी अवस्थेतील प्रेमला तात्काळ उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून, लग्नातील वाद नेमका कोणत्या कारणावरून उफाळला आणि हल्ल्यामागे कोणकोण होते, याचा सखोल तपास पोलिस यंत्रणेकडून सुरू आहे. या रक्तरंजित घटनेमुळे बोरनार गाव आणि परिसरात हळहळ व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *