गोवा: विधानसभेचे १६ डिसेंबरला एकदिवसीय अधिवेशन; विरोधकांचा 'लोकशाहीचा अपमान' म्हणत हल्लाबोल

गोवा: येत्या १६ डिसेंबर २०२६ रोजी गोवा विधानसभेचे एक दिवसाचे अधिवेशन जाहीर करण्यात आले असून, राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी या अधिवेशनासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केला आहे. जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, १६ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता पर्वरी येथील विधानसभा सभागृहात अधिवेशनाचे कामकाज सुरू होणार आहे. आठव्या गोवा विधानसभेच्या १५ व्या अधिवेशनासाठी हे समन्स काढण्यात आले असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या अल्पकालीन अधिवेशनावरून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, केवळ एका दिवसाचे विधानसभा अधिवेशन बोलावण्याच्या निर्णयावर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे. एक दिवसीय विधानसभा अधिवेशन म्हणजे लोकशाहीचा अपमान असून, राज्य सरकारला उत्तरदायित्वाची भीती वाटत असल्यामुळेच हे अल्पकालीन अधिवेशन बोलावण्यात आले आहे, असा घणाघात युरी आलेमाव यांनी केला.

गोव्यातील विविध ज्वलंत प्रश्नांवर आणि जनतेच्या समस्यांवर अवघ्या एका दिवसात सखोल चर्चा कशी होणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. विरोधी पक्षांच्या प्रश्नांना सामोरे जाण्याऐवजी आणि त्यावर उत्तरे देण्याऐवजी विधानसभा अधिवेशनाला निवडणूक प्रचाराचे व्यासपीठ बनविण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप युरी आलेमाव यांनी केला.

आलेमाव यांनी पुढे सांगितले की, भाजप सरकारला गोव्यातील महत्त्वाच्या आणि ज्वलंत प्रश्नांवर चर्चा करण्यात कोणताही रस राहिलेला नाही. तसेच, लोकप्रतिनिधींनी आणि विरोधकांनी सभागृहात विचारलेल्या अवघड प्रश्नांची उत्तरे देण्याचीही सरकारची तयारी नाही. त्याऐवजी नव्या घोषणा करणे आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध आश्वासने देण्यासाठी विधानसभेचा वापर केवळ प्रसिद्धीचे व प्रचाराचे व्यासपीठ म्हणून करण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. या आरोपांमुळे गोव्याच्या राजकीय वर्तुळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद रंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *