जळगाव: शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे ५० ते ६० घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले

जळगाव: एक अत्यंत मोठी आणि थरारक बातमी समोर आली आहे. विदर्भासह उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली असून, त्यामुळे अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. जळगाव जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यातील नालबंदी येथे मुसळधार पावसामुळे अचानक भीषण पूरस्थिती निर्माण झाली. गावाजवळील नाल्यांना आलेल्या पुराचे पाणी थेट जिल्हा परिषद शाळेत शिरले.

शाळेला पावसाच्या पुराच्या पाण्याने चोहोबाजुंनी वेढा दिल्यामुळे शाळेत उपस्थित असलेले शिक्षक इम्तियाज खान हे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तातडीने शाळेच्या गच्चीवर जाऊन चढले. पाण्याची पातळी वेगाने वाढत असल्याने मोठा अनर्थ ओढवण्याची शक्यता निर्माण झाली होती. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी प्रचंड धाडस दाखवत तात्काळ बचावकार्य सुरू केले आणि शर्थीचे प्रयत्न करत त्या शिक्षकाची गच्चीवरून अतिशय थरारक रीत्या सुखरूप सुटका केली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु अचानक आलेल्या पुरामुळे गावात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते.

याच मुसळधार पावसामुळे आणि जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाच्या बॅकवॉटरमुळे धामोडी गावात अत्यंत गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. धरण झाल्यापासून वेळोवेळी पावसाळ्यात गावालगत पाणी साचत असून यंदाही ५० ते ६० घरांना पुराच्या पाण्याने चोहोबाजुंनी वेढा दिला आहे, ज्यामुळे नागरिकांना अतोनात हाल सहन करावे लागत आहेत.

सततच्या पावसामुळे बॅकवॉटरची पातळी वाढल्याने गावात पाणी शिरले आणि जनजीवन विस्कळीत झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी गावातील मंदिरात हलवले. तसेच या मुसळधार पावसात जडगावमधील भडगाव तालुक्यात गिरणा नदीवर असलेल्या जामदा डाव्या कालव्याचा मातीचा भराव वाहून गेल्याने कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले आहे, ज्यामुळे परिसरातील शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पाटबंधारे विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून बंधारा दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *