सिंधुदुर्ग: देवगड-निपाणी राज्य मार्गावर चालत्या दुचाकीवर अचानक वडाचे झाड कोसळल्याने एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

सिंधुदुर्ग: देवगड-निपाणी राज्य मार्गावर असलदे, उगवतीवाडी येथे चालत्या दुचाकीवर जुनाट वटवृक्षाची मोठी फांदी कोसळल्याने दुचाकीस्वार वसंत उर्फ प्रतिक प्रकाश वाळके (वय २५, रा. असलदे-मधलीवाडी) याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेला संदेश नरे याच्यासह तिघे जण जखमी झाले. धोकादायक वटवृक्ष हटविण्याची वारंवार मागणी करूनही संबंधित ठेकेदार कंपनीने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी घटनास्थळी आक्रमक भूमिका घेतली. मृताच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई मिळावी व संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरल्याने काही काळ राज्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
मुंबईवरुन गणेशोत्सवासाठी असलदे येथे गावी आलेला वसंत उर्फ प्रतिक प्रकाश वाळके, रा. असलदे, मधलीवाडी हा दुचाकी घेऊन नांदगाव तिठा येथे दूध आणण्यासाठी गेला होता. नांदगाव येथून घरी परतत असताना येथील उगवतीवाडी येथील सर्व्हिसिंग सेंटरसमोर देवगड निपाणी रस्त्यावर जुनाट वटवृक्षाची मोठी फांदी अचानक चालत्या दुचाकीवर कोसळली.

त्यात वसंत उर्फ प्रतिक वाळके याचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीच्या मागे बसलेला संदेश सखाराम नरे (रा. असलदे) याने प्रसंगावधान ओळखून उडी मारल्याने वाचला. मात्र, त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. तर यावेळेस थोडेसे पुढे जाणा-या सारिका शिवाजी डामरे व शिवाजी रमेश डामरे (रा. असलदे डामरेवाडी) त्यांना फांदीचा मार लागल्याने ते सुद्धा जखमी झाले.


संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
या अपघाताची माहिती समजताच असलदे ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत देवगड निपाणी रस्ता विकसित करत असलेल्या कंपनीच्या व्यवस्थापकाला धारेवर धरले. हटविण्यास सांगितल्यानंतर धोकादायक वटवृक्ष हटविण्यात का आले नाहीत ? असा जाब विचारण्यात आला. यावेळी संतप्त कुटुंबीय व नागरिकांनी जोपर्यंत मृताच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई मिळणार नाही, संबंधितांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला. अखेर उशिरा सकारात्मक चर्चेतून मार्ग काढण्यात आला.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *