पुणे: महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आवारात तुफान राडा! रेखा कोंडे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण, चार महिलांविरोधात गुन्हा दाखल

पुणे: शहरातील सदाशिव पेठ परिसरातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आवारात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या शहर संघटिका रेखा कोंडे यांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात चार महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठा आरक्षण आंदोलक व अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकारी आरती मारणे-पवार, त्यांची आई, मुलगी आणि बहीण पूनम दाभेकर अशी गुन्हा दाखल झालेल्या चार महिलांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. २० नोव्हेंबर २०२६) रात्री आठच्या सुमारास टिळक रोडवरील सदाशिव पेठेतील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आवारात ही घटना घडली. रेखा कोंडे या मारुतीराव डोंगरे प्रतिष्ठानतर्फे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. हा कार्यक्रम संपवून त्या सभागृहाच्या बाहेर पडत असताना आरती मारणे-पवार आणि त्यांच्यासोबतच्या महिला तेथे आल्या.

रेखा कोंडे आणि आरती मारणे यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात भूमिका घेतल्याच्या कारणावरून आरती मारणे आणि त्यांच्या नातेवाईकांनी रेखा कोंडे यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या झटापटीत कोंडे यांचे केस ओढून त्यांना खाली पाडण्यात आले; तसेच या गोंधळात त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्रही गहाळ झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. या संपूर्ण मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

घटनेनंतर रात्री उशिरा रेखा सुधाकर कोंडे (वय ४३, रा. वडगाव बुद्रुक, पुणे) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेत सविस्तर तक्रार नोंदवली. त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, आपण मराठा क्रांती मोर्चामध्ये समन्वयक तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये शहर समन्वयक म्हणून काम करतो. मनोज जरांगे पाटील यांची भूमिका पटत नसल्याने आपण सोशल मीडियावर व्यक्त होत असतो, जे आरती मारणे-पवार यांना आवडत नाही. यापूर्वी ३० ऑक्टोबर २०२६ रोजी आरती मारणे हिची बहीण पूनम दाभेकर हिने आपल्या चारित्र्याबाबत आक्षेपार्ह व्हिडिओ फेसबुकवर प्रसारित करून बदनामी केली होती, असेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

त्यानंतर २० नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ८:१० च्या सुमारास महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रोड येथे कार्यक्रमातून बाहेर येत असताना आरती मारणे-पवार, तिची आई व मुलगी यांनी अचानक हल्ला करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि जीवे मारण्याची व जरांगे पाटील यांच्या विरोधात न बोलण्याची धमकी दिल्याचा आरोप रेखा कोंडे यांनी केला आहे. या तक्रारीवरून विश्रामबाग पोलिसांनी चारही महिलांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक विकास अडागळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *