नागपूर: कापसावरील आयात शुल्क २० टक्के करा, अन्यथा लक्ष्यित आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचा नागपुरातून सरकारला १५ दिवसांचा इशारा

नागपूर: यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट झाली असून, ते तीव्र आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत कापसावरील आयात शुल्क २० टक्के करावे, अशी आग्रही मागणी करत येत्या १० ते १५ दिवसांत शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय न झाल्यास 'टार्गेटेट' (लक्ष्यित) आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. शनिवारी (दि. २१ नोव्हेंबर २०२६) नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर तीव्र टीका करत हा अल्टीमेटम दिला.

पत्रकार परिषदेत बोलताना ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, दुष्काळी परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान होऊन शेतकरी आधीच मेटाकुटीला आले आहेत. त्यातच सरकारने जाहीर केलेली मदत अपुरी असून, नुकसानभरपाईसाठी ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसानाची अट घालण्यात आली आहे. या अटीमुळे ज्या शेतकऱ्यांचे ३२ टक्के नुकसान झाले आहे, त्यांना शासकीय मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे; ही बाब अन्यायकारक आहे.

विदर्भ आणि मराठवाडा हे प्रमुख कापूस उत्पादक प्रदेश असल्याचे नमूद करत त्यांनी म्हटले की, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे कोणतेही ठोस धोरण दिसत नाही. केंद्र सरकारने कापसावरील आयात शुल्क शून्य केल्यामुळे देशांतर्गत बाजारात कापसाच्या दरावर मोठा दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

कापसाचे दर पूर्वी ९,५०० रुपयांपर्यंत पोहोचले होते; मात्र आयात शुल्क शून्य केल्याने हे दर घसरून सहा हजार रुपयांच्या घरात येण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सरकारने तात्काळ कापसावरील आयात शुल्क २० टक्के करावे. यापूर्वी हे शुल्क १७ टक्क्यांपर्यंत होते आणि त्यात केवळ तीन टक्क्यांची वाढ करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांच्या मागण्यांवर केंद्र व राज्य सरकारने १० ते १५ दिवसांत ठोस निर्णय घ्यावा. अन्यथा पारंपरिक पद्धतीने आंदोलन न करता विशिष्ट ठिकाणांना लक्ष्य करून तीव्र आंदोलन केले जाईल. या आंदोलनाचे स्वरूप योग्य वेळी जाहीर करण्यात येईल आणि यामध्ये विविध शेतकरी संघटनाही सहभागी होणार असल्याचे ॲड. आंबेडकर यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला शेतकरी कामगार पक्षाचे मोहन गुंड पाटील, शेतकरी हक्क मोर्चाचे राजेंद्र आमटे, युवा शेतकरी संघर्ष समितीचे अजय राऊत यांच्यासह विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *