पुणे: चार वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीच शिक्षिकेची निर्घृण हत्या! पुरंदर तालुक्यातील घटनेने हळहळ, आरोपी दीर ७ तासांत जेरबंद

पुणे: जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील पांगारे येथे पैशांच्या व मालमत्तेच्या आर्थिक वादातून एका ४७ वर्षीय शिक्षिकेचा लोखंडी रॉड आणि विटेने डोक्यावर प्रहार करून निर्घृण खून करण्यात आल्याची अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. उज्ज्वला रामदास काकडे (वय ४७) असे मृत शिक्षिकेचे नाव असून, विशेष म्हणजे ज्या दिवशी ही घटना घडली त्याच दिवशी त्यांच्या चार वर्षांच्या चिमुकल्या मुलीचा वाढदिवस होता. आनंदाच्या आणि उत्साहाच्या दिवशीच आईची हत्या झाल्याने संपूर्ण पुरंदर तालुक्यात व परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपी दीर शशिकांत माणिकराव काकडे याला सासवड पोलिसांनी अवघ्या सात तासांच्या आत जेरबंद केले असून, शिरवळ परिसरातील डोंगराळ भागात कसून शोधमोहीम राबवून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

गुरुवारी (दि. १९ नोव्हेंबर २०२६) सकाळी ८.४० वाजण्याच्या सुमारास पांगारे येथे ही धक्कादायक घटना घडली. मृत महिलेचे भाऊ गणेश दत्तात्रय मेमाणे यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, उज्ज्वला यांच्या पतीने घेतलेले पैसे, चेक, सोन्याचे दागिने तसेच महत्त्वाची कागदपत्रे परत मागण्यावरून कुटुंबात गेल्या काही काळापासून वाद सुरू होता. याच आर्थिक व कौटुंबिक वादातून आरोपी दीर शशिकांत काकडे याने उज्ज्वला यांच्यावर लोखंडी रॉड आणि विटेने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात त्या गंभीररीत्या जखमी झाल्या आणि त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात सासू सुलोचना काकडे यांनी आरोपीला पाठबळ दिल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी तात्काळ गुन्हेशोध पथकाला आरोपीचा शोध घेण्याचे निर्देश दिले. पोलिसांनी घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती व गोपनीय बातमीदारांच्या आधारे वेगाने तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपी एका चारचाकी वाहनातून पसार झाल्याचे स्पष्ट झाले. त्याने सातारा जिल्ह्यातील शिरवळ परिसरात आपले वाहन सोडून तेथून डोंगराळ भागात पळ काढला होता. त्यानंतर सासवड पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने त्या डोंगराळ भागात शोधमोहीम राबवून शशिकांत काकडे याला अटक केली. प्राथमिक चौकशीत आरोपीने या गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५८२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३ आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर राजपूत, वैभव सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक युवराज धोंडे व त्यांच्या पथकाने ही धडक कारवाई यशस्वी केली. या घटनेचा पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे हे करीत आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *