सांगली: जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीवेळी जयंत पाटील चीनमध्ये तोंड लपवून बसले; भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा घणाघात

सांगली: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीच्या वेळी जयंत पाटील चीनमध्ये जाऊन तोंड लपवून बसले, असा खोचक आणि आक्रमक टोला गोपीचंद पडळकर यांनी लगावला आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आणि अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या घडामोडींदरम्यान सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या निवडीच्या वेळी महत्त्वाची चर्चा आणि राजकीय घडामोडी सुरू असताना जयंत पाटील प्रत्यक्ष उपस्थित न राहता चीन दौऱ्यावर गेले असल्याचा मुद्दा उपस्थित करत पडळकर यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. यापूर्वी 'नवरदेव' होणार असल्याच्या चर्चांवरूनही पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका केली होती; मात्र निवडीच्या वेळी ते चीनमध्ये गेल्याने त्यांनी राजकीय जबाबदारी आणि चर्चेपासून पळ काढल्याचा आरोप पडळकर यांनी केला आहे.

याच दरम्यान, गोपीचंद पडळकर यांनी काँग्रेस नेते आमदार विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्या भूमिकेवरही भाष्य केले. सध्या भारतीय जनता पक्षामुळे काँग्रेस नेत्यांचा आत्मविश्वास वाढला असून, त्यामुळेच विश्वजीत कदम आणि विशाल पाटील हे आज जयंत पाटील यांना डोळे वटारून दाखवत आहेत, असे विधान पडळकर यांनी केले. तसेच, जिल्हा बँकेच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जत सोसायटी गटातून विजय मिळवल्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी बँकेच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. जिल्हा बँकेचा कारभार केवळ ठरावीक लोकांच्या किंवा एका कुटुंबाच्या हातात केंद्रित राहू देणार नसून, शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि बँकेच्या पारदर्शक कारभारासाठी आवाज उठवत राहणार असल्याचे पडळकर यांनी स्पष्ट केले आहे. जयंत पाटील यांच्या चीन दौऱ्याच्या मुद्द्यावरून पडळकर यांनी केलेल्या या टीकेमुळे सांगलीसह पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात नवी खळबळ उडाली आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *