छत्रपती संभाजीनगर: ड्युटी संपवून घरी निघालेल्या सुपरवायझरवर काळाचा घाला! वाळूज एमआयडीसीत कंपनीच्याच बसच्या धडकेत मृत्यू, चालकावर कारवाईची मागणी

छत्रपती संभाजीनगर: जिल्ह्यातील वाळूज एमआयडीसी परिसरात कार्यरत असलेल्या बजाज कंपनीतील एका सुपरवायझरचा कंपनीच्याच बसच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गुरुवारी (दि.19 नोव्हेंबर २०२६) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आपली ड्युटी संपवून दुचाकीवरून घरी परतत असताना राजकिरण साहेबराव तायडे (वय ४०) यांना कंपनीच्या बसने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या तायडे यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

पोलिसांत दिलेल्या माहितीनुसार, राजकिरण साहेबराव तायडे हे वाळूज एमआयडीसीतील बजाज कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून कार्यरत होते. गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास कामाची वेळ पूर्ण झाल्यानंतर ते आपल्या दुचाकीवरून घराकडे निघाले होते. त्याच वेळी कंपनीच्या MH-20-GZ-5418 क्रमांकाच्या बसच्या चालकाने अत्यंत निष्काळजीपणे आणि हयगयीने वळण घेतल्याने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली, असा आरोप नातेवाइकांकडून करण्यात आला आहे.

या भीषण धडकेत राजकिरण तायडे हे गंभीररीत्या जखमी झाले होते. अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आणि त्यांना मृत घोषित करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि पुढील तपास सुरू केला आहे. निष्काळजीपणे वळण घेऊन या अपघातास कारणीभूत ठरलेल्या कंपनी बसचालकावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी मृताच्या नातेवाइकांनी केली आहे. कुटुंबाचा आधारस्तंभ असलेल्या राजकिरण तायडे यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबीयांवर आभाळ कोसळले असून, बजाज कंपनीतील कामगार व सहकाऱ्यांमध्येही तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *