मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ

मुंबई: सातारा जिल्ह्यातून मुंबईत हायड्रो गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन तरुणांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. ओमकार पवार (२८, रा. भाकरवाडी, ता. कोरेगाव, जि. सातारा) आणि पियुष घोंगडे (२२, रा. वाठार स्टेशन, ता. कोरेगाव, जि. सातारा) अशी तरुणांची नावे आहेत. ही कारवाई अंधेरी पूर्व परिसरात करण्यात आली असून, पोलिसांनी ६६ लाख ३६ हजार रुपयांचा १ किलो ८९६ ग्रॅम हायड्रो गांजा जप्त केला आहे.

गुरुवारी रात्री एमआयडीसी पोलिसांचे अंमली पदार्थविरोधी पथक परिसरात गस्त घालत असताना ही कारवाई करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक रणजीत गोंदुकुष्पे आणि त्यांचे पथक रात्री ७.५० च्या सुमारास जे. के. इंडस्ट्रियल इस्टेटजवळील पेपर बॉक्स रोड परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी दोन तरुण संशयास्पदरीत्या फिरताना पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्यांना हटकताच त्यापैकी एकाने हातातील लाल रंगाची प्लास्टिकची पिशवी लपविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या प्रश्नांना सामोरे जाण्याऐवजी दोघांनीही तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला.

मात्र, पोलिसांनी तत्परतेने पाठलाग करून दोघांनाही ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान ओमकार पवार याच्याकडील लाल रंगाच्या पिशवीत १ किलो ८९६ ग्रॅम हायड्रो गांजा आढळला. आंतरराष्ट्रीय बाजारमूल्याच्या अनुषंगाने या अमली पदार्थाची किंमत ६६ लाख ३६ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.


तस्करीत कोणाचे हात?
प्रकरणी पोलिस हवालदार गौतम बडे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना गांजा कोणी पुरविला, मुंबईत त्याचे वितरण कोणाकडे होणार होते आणि या व्यवहारामागे आणखी कोणाचे हात आहेत, याचा तपास एमआयडीसी पोलिस करीत आहेत. ही कारवाई पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक घनश्याम नायर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) सुनील करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रणजीत गोंदुकुष्पे, हवालदार गौतम बडे, बाबू येडगे, सचिन ठोंबरे, लोखंडे, बिनल शिंगाणे यांनी केली.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *