Pune : पुण्यात प्रेमाच्या नावाखाली तरुणीची फसवणूक; लग्नाचे आमिष दाखवून नोकरी लागताच तरुण पलटला!

Pune : “आता थोडं थांब, सगळं ठीक झालं की आपण लग्न करू,” असं म्हणत एक तरुण तब्बल सहा वर्षं एका मुलीला आश्वासनांच्या जाळ्यात अडकवत होता. विश्वास, प्रेम आणि भविष्याची स्वप्न रंगवत असतानाच तो आतून वेगळाच डाव आखत होता, अखेर तो उघड झाला. पुण्यातील चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत संबंधित प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील आरोपी 29 वर्षांचा आहे. दोघांची 2018 मध्ये सोशल मीडियावर ओळख झाली, गप्पा वाढल्या, भेटीगाठी सुरू झाल्या आणि त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. “आपण लग्न करू” या शब्दांवर विश्वास ठेवत मुलगी पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून राहिली.

हळूहळू त्याने तिचा विश्वास जिंकत नातं अधिक घट्ट केलं. मधल्या काळात दोन्ही कुटुंबांमध्येही चर्चा झाली, टिळ्याचा समारंभही पार पडला. त्यामुळे मुलीचा विश्वास आणखी पक्का झाला “आता लग्न ठरलेलं आहे,” असं तिला वाटू लागलं.

पण इथेच प्रकरणाला वळण आले
मुलाच्या मामाने लग्न मोठं करायचं असे सांगून लग्न मोडण्याचा प्रयत्न केला. तरीही “आपण आधीच एकत्र आहोत” असं सांगत तो तिला भावनिकरित्या गुंतवत राहिला. एकवेळ दिवशी मंदिरात जाऊन दोघांनी लग्नही केले. घरच्यांनी परवानगी देईपर्यंत आपण वेगवेगळे राहू असे सांगून त्यानंतर शारीरिक संबंधही ठेवल्याचे पीडितेने तक्रारीत सांगितले. वेळ जात होती, पण लग्नाचं ठोस काहीच होत नव्हतं.

दरम्यान, 2025 मध्ये त्याला महापालिकेत नोकरी लागली आणि इथून सगळं बदलायला सुरुवात झाली. अचानक त्याच्या बोलण्यात बदल झाला. “मोठं लग्न करावं लागेल, घरच्यांना पटवावं लागेल,” अशा नवीन अटी पुढे येऊ लागल्या. त्यामुळे हळूहळू मुलीलाही नात्यावर शंका येऊ लागली.

आणि एक दिवस सगळं कोसळलं
संबंधित तरुणाचं दुसऱ्याच मुलीशी लग्न ठरल्याचं समजताच पीडितेला जबर धक्का बसला. सहा वर्ष ज्या नात्यावर विश्वास ठेवला, ते सगळं खोटं ठरल्याची जाणीव झाली. विश्वास तुटला आणि यानंतर तिने थेट पोलीस ठाणे गाठलं. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपास सुरू केला आणि आरोपीला अटक केली.

त्याच्यावर फसवणूक, जबरदस्तीने संबंध ठेवणे यांसारख्या गंभीर आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या हा तरुण कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे “प्रेमाच्या नावाखाली नेमकं काय चाललंय?” असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *