पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ

पुणे: दिल्लीहून पुण्यात येत असलेल्या इंडिगोचेविमान हवेत होते. त्याचवेळी अचानक सायरन वाजण्यास सुरुवात झाली. त्यामुळे विमानातील प्रवाशांमध्ये भीती पसरली. सायरन का वाजायला लागले हे तपासले असता १९ ब सीटवर बसलेला प्रवासी विमानातील आपत्कालीन दरवाजा उघडण्यासाठी असलेल्या लिव्हरवरील कव्हर उघडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले. प्रवाशांच्या जिवितास धोका पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी या प्रवाशावर गुन्हा दाखल केला आहे.

गौरव सत्येंद्र रौतेला (वय ३३, रा. आनंद पार्क, तारादत्त पूर्व सोसायटी, सासवड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रवाशाचे नाव आहे. याबाबत इंडिगो कंपनीचे सुरक्षा विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक ओंकार विनोद कुलकर्णी (वय २८, रा. हिंजवडी) यांनी विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना दिल्ली ते पुणे विमानात २ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री पाऊणच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव रौतेला हे एका खासगी कंपनीत नोकरी करतात. ते इंडिगोच्या विमानाने दिल्लीहून पुण्यात येत होते. विमानाने दिल्ली विमानतळावरून उड्डाण घेतले. त्यानंतर काही वेळातच विमानातील सायरन वाजण्यास सुरुवात झाली. या आवाजाने विमानातील प्रवाशांमध्ये भीती पसरली. विमानातील वैमानिक व इतर अटेंडंट यांनी तपासणी केली तेव्हा १९ ब सीटवरील प्रवाशाने विमानातील आपत्कालीन दरवाजा उघडण्याकरिता त्याच्यावर असलेले लिव्हरवरील कव्हर उघडण्याचा प्रयत्न केल्याचे दिसले. त्यामुळे विमानातील लोकांनी त्याला रोखले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने त्याला ही खिडकी असावी, असे समजून ती उघडण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले. मध्यरात्री पाऊण वाजता विमान हवेत असताना हा प्रकार घडला. त्यानंतर साधारण अडीच वाजता विमान पुणे विमानतळावर सुरक्षितपणे उतरले. त्यानंतर गौरव रौतेला याला विमानतळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.


इंडिगोच्या सुरक्षा विभागाने तक्रार दिली आहे. विमानातील इतर प्रवाशांच्या जिवितास व वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात येईल, अशी कृती केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. विमानतळ पोलिसांनी गौरव रौतेला याला नोटीस दिली असून, अशोक शिरसाट पुढील तपास करत आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *