बीड: 'खून का बदला खून'! बिबट्याने पिलाला मारले, संतापलेल्या कुत्रीने थेट बिबट्याचा शावक संपवला!

बीड: कुत्र्याचे लहान पिलू खेळत असताना बिबट्याने त्याला सकाळी मारले. हे कळताच दुपारच्या वेळी कुत्रीने बदला घेण्यासाठी चक्क एक वर्षाच्या बिबट्याच्या शावकाचा (पिल्लू) बळी घेतल्याची घटना आष्टी तालुक्यातील दौलावडगाव येथील थोरातवस्ती येथे सोमवारी दुपारी साडेतीन वाजता समोर आली आहे.

सकाळी पिल्लाचा बळी आणि दुपारी धक्कादायक प्रतिशोध

आष्टी तालुक्यातील दौलावडगाव परिसरात बिबट्याचा वावर असून बिबट्याने यापूर्वी अनेक श्वानांना मारल्याच्या घटना कॅमेऱ्यात देखील कैद झाल्या आहेत. परंतु सोमवारी एक वेगळीच आणि थक्क करणारी घटना समोर आली. काही दिवसांपूर्वी एका कुत्रीने काही पिलांना जन्म दिला होता. त्यातील एक पिल्लू परिसरात खेळत असताना सकाळच्या दरम्यान बिबट्याने त्याला मारले. आपल्या पिल्लाचा मृत्यू झाल्याच्या संतापातून व बदला घेण्याच्या भावनेतून दुपारच्या सुमारास कुत्रीने थेट बिबट्याच्या एक वर्ष वय असलेल्या शावकाला (पिल्लाला) मारल्याची घटना उघडकीस आली. विशेष म्हणजे कुत्र्याचे पिल्लू आणि बिबट्याचा शावक असे दोन्ही मृतदेह घटनास्थळी आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

वनविभागाचा पंचनामा, शवविच्छेदन आणि दफनविधी

या घटनेची माहिती मिळताच आष्टीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे (अमोल मुंढे) यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन सखोल पाहणी व पंचनामा केला. या पथकात वनपाल लक्ष्मण तागड, वनरक्षक कल्पना विधाते, वनसेवक युनूस शेख, बन्सी तांदळे, गोरख पवार, कानिफ पवार, दत्तू भूकन आदी कर्मचाऱ्यांचा समावेश होता. त्यानंतर दौलावडगाव येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कारखिले, डॉ. कुंभार आणि डॉ. काळे यांनी मृत बिबट्याच्या शावकाचे शवविच्छेदन केले. शवविच्छेदनानंतर सर्व शासकीय नियमांचे पालन करत मृत बछड्याचा दफनविधी आष्टी वनपरिक्षेत्र कार्यालय आवारात करण्यात आला.

घटनास्थळाची स्थिती व प्रशासनाचे सतर्कतेचे आवाहन 

वनपाल लक्ष्मण तागड यांनी दिलेल्या माहितीनुसार, दौलावडगाव परिसरात बिबट्याने कुत्र्याच्या पिल्लावर हल्ला केल्याच्या ठिकाणी कुत्र्याचे पिल्लू मृतावस्थेत दिसून आले, तर त्यानंतर दुपारच्या सुमारास बिबट्याच्या पिल्लाला कुत्रीने मारल्याचे स्पष्ट झाले. ग्रामीण व डोंगराळ भागात बिबट्यांचा वावर वाढत असून वन्यजीव आणि मानवी वस्ती तसेच पाळीव प्राण्यांमध्ये संघर्ष निर्माण होत असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे. वन्यजीवांच्या संरक्षणाची जबाबदारी केवळ वनविभागाची नसून ग्रामस्थांचाही सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे नागरिकांनी व शेतकऱ्यांनी शेतात किंवा वस्तीवर जाताना विशेष सतर्कता बाळगावी, वन्यप्राणी आढळल्यास त्यांना त्रास न देता किंवा जमाव न करता तातडीने वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.



शहर

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *