छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावर सावंगी जवळ भीषण अपघात: चालकाला डुलकी लागल्याने ट्रॅव्हल्स उलटली; दोघांचा मृत्यू, ३० प्रवासी जखमी!

छत्रपती संभाजीनगर: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास पुन्हा एकदा झोपेच्या डुलकीने दोन निष्पाप प्रवाशांचा बळी घेतला आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सावंगी परिसरात चॅनेल क्रमांक ४२६ जवळ चालकाला डुलकी लागल्याने वाशिमवरून मुंबईला जाणारी चाणक्य ट्रॅव्हल्सची स्लीपर बस पुलाच्या कठड्यावर आदळून पलटी झाली. या भीषण अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून ३० प्रवासी जखमी झाले आहेत. रविवारी (दि. २२ नोव्हेंबर) मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

काही फुटांवरच होती खोल खाई; बस पुलावरच पलटी झाल्याने टळला मोठा अनर्थ

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, वाशिम येथून प्रवाशांना घेऊन चाणक्य ट्रॅव्हल्सची (क्रमांक MP 41 9955) खाजगी स्लीपर बस मुंबईच्या दिशेने समृद्धी महामार्गावरून धावत होती. सावंगी परिसरातील चॅनेल क्रमांक ४२६ जवळ मध्यरात्री सुमारे १ वाजेच्या सुमारास बस चालकाला अचानक झोपेची डुलकी लागली. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव बस पुलाच्या कठड्यावर जोरात आदळून जागेवरच उलटली.

ज्या पुलावर ही बस उलटली, त्याच्या बाजूला अवघ्या काही फुटांवर खोल खाई होती. जर बसने कठडा तोडून थेट खाईत कोसळली असती, तर जीवितहानीचा आकडा आणखी वाढून मोठा अनर्थ घडला असता; परंतु बस पुलाच्या कठड्यावर अडकून पुलावरच पलटी झाल्याने अनेक प्रवाशांचे प्राण वाचले.

पोलिसांकडून तत्काळ मदतकार्य

अपघाताची माहिती मिळताच प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक डॉ. सोनाली पाईकराव यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णवाहिकांमधून छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी रुग्णालय) उपचारासाठी दाखल करण्यात आले. फुलंब्री पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. २३ नोव्हेंबर) सकाळी ९ वाजता मृत्यूची नोंद करण्यात आली. या बचाव व मदतकार्यात पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे, पोउपनि राम बारहाते, जमादार लालचंद नागलोड, जमादार अंकुश बागल तसेच चालक चाटे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

मृतांत पुसदच्या तरुणाचा समावेश; चौघांची प्रकृती गंभीर

  • मृतांची माहिती: या दुर्घटनेत उत्तम रामू जाधव (वय ३५, रा. पुसद) यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यासोबतच्या दुसऱ्या मृत प्रवाशाची ओळख अद्याप पटलेली नाही.

  • जखमींची माहिती: या अपघातात एकूण ३० प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींमध्ये अनुराधा परदेशी (४५), कृष्णा बांधणकर (१०), आरती बांधणकर (३५, रा. मुलुंड), अरुणा बोबिलकर (४३, रा. कल्याण) यांच्यासह इतर प्रवाशांचा समावेश असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *