सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!

सिंधुदुर्ग: महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत अनधिकृतपणे घुसखोरी करून बेकायदा मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय नौकांविरोधात मत्स्यव्यवसाय विभागाने पुन्हा एकदा धडक कारवाई केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड किनारपट्टीसमोरील समुद्रात कर्नाटक राज्यातील 'सुलतान' नावाची हायस्पीड ट्रॉलर नौका कोणतीही परवानगी न घेता बेकायदा मासेमारी करत असताना मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाने रंगेहात पकडली. २ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री ही थरारक कारवाई करण्यात आली असून, या नौकेवरील तांडेलसह (खलाशी प्रमुख) एकूण सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

कारवाईची पार्श्वभूमी व पाठलाग

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, महाराष्ट्र शासनाच्या सागरी हद्दीत परराज्यातील नौका येऊन बेकायदा आणि पर्ससीन नेटसारख्या प्रतिबंधित साधनांचा वापर करून मासेमारी करत असल्याच्या तक्रारी वारंवार मिळत होत्या. याच पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय विभागाचे गस्ती पथक सिंधुदुर्ग किनारपट्टीवर समुद्रात गस्त घालत होते. यादरम्यान, देवगड समुद्राच्या हद्दीत कर्नाटक राज्यातील 'सुलतान' ही संशयित ट्रॉलर नौका विनापरवाना मासेमारी करताना निदर्शनास आली.

मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाने या नौकेला पाहताच तिला रोखण्याचा आणि तपासणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गस्ती नौकेला पाहताच 'सुलतान' नौकेच्या चालकाने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला व वेगाने नौका हाकली. काही वेळ गस्ती पथकाने या नौकेचा समुद्रात थरारक पाठलाग केला. अखेर सतर्क गस्ती पथकाने शिताफीने या नौकेला रोखले आणि आपल्या ताब्यात घेतले.

नौका देवगड बंदरात आणली, कायदेशीर कारवाई सुरू

अरेरावी करत पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या या नौकेला आणि त्यावर असलेल्या तांडेलसह सातही खलाशांना जेरबंद करून देवगड बंदरात आणण्यात आले. मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी सुरू केली असून, बेकायदा मासेमारी केल्याप्रकरणी संबंधित नौकेवर नियमांनुसार कठोर दंडात्मक व कायदेशीर कारवाई केली जात आहे. या संपूर्ण कारवाईचा सविस्तर अहवाल सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सहायक आयुक्त, मत्स्यव्यवसाय यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. स्थानिक पारंपरिक मासेमारांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि सागरी सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *