पुणे: खडकवासला-फुरसुंगी बोगद्यातून २० हजार कोटींची जमीन मोकळी होणार! पाणी बचतीसह वाहतुकीलाही मिळणार मोठी चालना

पुणे: पुण्यातील प्रस्तावित खडकवासला-फुरसुंगी बोगदा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तब्बल २० हजार कोटी रुपये बाजारमूल्य असलेली जमीन शहराच्या विकासकामांसाठी उपलब्ध होणार आहे. या जमिनीचा वापर भविष्यात विविध प्रकल्पांसाठी करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र विधिमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष आमदार राहुल कुल यांनी दिली आहे.

समितीचा पुणे आणि सातारा जिल्ह्यांचा दौरा सुरू असून, त्यानिमित्त पुण्यातील विधानभवनात सोमवारी सकाळी महत्त्वाची बैठक पार पडली. आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत पुणे आणि परिसरातील विविध महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा तसेच सरकारी उपक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये खडकवासला ते फुरसुंगी बोगदा, 'टाटा'चे मुळशी धरण, उजनी धरण आणि रिंग रोड या प्रकल्पांच्या कामांचा समावेश होता. या बैठकीला समितीचे सदस्य आमदार नीलेश राणे, मिलिंद नार्वेकर, रईस शेख, विलास भुमरे, हेमंत ओगले आणि शिवाजीराव गर्जे उपस्थित होते.

या वेळी बोलताना आमदार राहुल कुल म्हणाले की, 'खडकवासला कालवा बंद व्हावा, यासाठी आमदार म्हणून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. हा बोगदा प्रकल्प १ हजार ६०० कोटी रुपयांचा असून, तो पूर्ण झाल्यावर जलसंपदा विभागाला उपलब्ध होणाऱ्या जमिनीचे बाजारमूल्य हे २० हजार कोटी रुपयांचे होईल. ही जमीन भविष्यात विविध विकास प्रकल्पांसाठी उपलब्ध करता येईल. सध्या खडकवासला कालवा हा सातत्याने फुटतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जाते. बोगदा प्रकल्पामुळे पाणी वाया जाण्याचे प्रकार पूर्णपणे थांबणार असून, ग्रामीण भागाला जास्त पाणी उपलब्ध होईल. भविष्यात या प्रकल्पातून वाहतुकीचा प्रश्नही सोडविला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी हा प्रकल्प वेळेत पूर्ण होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची सूचना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.'

दरम्यान, पुणे, पिंपरी-चिंचवडसह पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) हद्दीत भविष्यात पाण्याची मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणी साठवणूक आणि पाण्याच्या उपाययोजनासंदर्भात काय करता येईल, याचा या दौऱ्यात सखोल अभ्यास केला जाणार आहे.

मुळशी धरण व इतर प्रकल्पांचा आढावा

या बैठकीत इतर प्रकल्पांच्या प्रगतीवरही चर्चा करण्यात आली. ''टाटा'च्या मुळशी धरणातून पुण्याला पाणी मिळविण्यासंदर्भात राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले असून, त्याची कार्यवाही सुरू केली आहे. त्या संदर्भातील कामांचा आढावा घेणे आणि सरकारला आवश्यक शिफारशी करणे हा या समितीचा प्रमुख उद्देश आहे. तसेच पुण्याच्या नदीतील पाणी सातत्याने प्रदूषित होण्याबाबत तक्रारी येत आहेत. त्याबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाची (MPCB) बैठक घेण्यात आली आहे. याशिवाय रिंग रोड प्रकल्पाला भेट देऊन त्याच्या कामाची पाहणी करून लवकरच काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत,' असेही आमदार राहुल कुल यांनी स्पष्ट केले.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *