पुणे: भोर पंचायत समितीत खळबळ! अधिकाऱ्याच्या टेबलवर लिंबू, हळद-कुंकू अन् धमकीची चिठ्ठी; तब्बल ८ महिन्यांपासून सीसीटीव्ही बंद!

पुणे: भोर पंचायत समितीच्या कार्यालयात सहाय्यक प्रशासकीय अधिकाऱ्याच्या टेबलवर लिंबाचे चार तुकडे, हळद, कुंकू, गुलाल, बुक्का आणि धमकीवजा मजकूर असलेली चिठ्ठी आढळल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अंधश्रद्धेतून जादूटोण्याचा प्रकार करण्यात आला की संबंधित अधिकाऱ्याला मानसिक दबावाखाली आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला, याबाबत सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. या धक्कादायक प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात भोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोर पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासकीय अधिकारी मिलिंद शिवराम खोपडे हे सोमवारी (दि. २३ नोव्हेंबर २०२६) सकाळी १० वाजता नेहमीप्रमाणे कार्यालयात कामकाजासाठी आले. त्यावेळी त्यांच्या टेबलवरील प्रिंटरजवळ एक टाइप केलेली चिठ्ठी आढळून आली. या चिठ्ठीसोबत लिंबाचे चार तुकडे करून त्यावर हळद, कुंकू, गुलाल आणि बुक्का ठेवण्यात आल्याचे दिसून आले. चिठ्ठीतील मजकूर एकेरी भाषेत असून, त्यातून खोपडे यांच्यावर विविध आरोप करण्यात आल्याचे समोर आले आहे.

कार्यालयात अशा प्रकारे अघोरी कृत्य आणि धमकीवजा मजकूर ठेवण्यात आल्याने पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांमध्ये भीती आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हा प्रकार कोणी केला, तो कार्यालयात कधी आला आणि त्यामागे नेमका काय उद्देश होता, याचा कसून शोध घेण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे, पंचायत समिती कार्यालयातील सीसीटीव्ही यंत्रणा गेल्या आठ महिन्यांपासून बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याच बंद सीसीटीव्ही यंत्रणेचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने कार्यालयात प्रवेश करून हा प्रकार केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे शासकीय कार्यालयातील सुरक्षेचा प्रश्नही पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

घटनेची माहिती मिळताच आणि प्रकार समोर आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने भोर पोलिसांकडे रीतसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे.

या संदर्भात प्रतिक्रिया देताना भोरचे गटविकास अधिकारी चंद्रकांत विपट म्हणाले की, "पंचायत समिती कार्यालयात घडलेला हा प्रकार घृणास्पद आणि निंदनीय आहे. या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून, संबंधित प्रकाराचा शोध घेतला जात आहे."



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *