कोल्हापूर: त्रिपुरारी पहाट! ५१ हजार दिव्यांनी उजळला पंचगंगा घाट; बोचऱ्या थंडीतही कोल्हापुरकरांचा उत्स्फूर्त सहभाग

कोल्हापूर: त्रिपुरारी पौर्णिमेच्या पहाटे, बोचणारी थंडी असतानाही मंगळवारी कोल्हापुरातील पंचगंगा नदी घाट तब्बल ५१ हजार दिव्यांनी उजळून निघाला. दिव्यांचा लख्ख प्रकाश, आकाशात झालेली मनोहारी आतषबाजी, आकर्षक रांगोळ्या तसेच करवीर निवासिनी श्री अंबाबाई, भगवान शिवशंकर आणि सदगुरू बाळूमामा अशा विविध देवतांच्या प्रतिकृतींनी संपूर्ण घाट परिसर सजला होता. थंडीची पर्वा न करता हौशी कोल्हापुरकरांनी आपल्या वतीने एकेक दिवा प्रज्वलित करत या भव्य दिपोत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

दिवाळीची सांगता त्रिपुरारी पौर्णिमेला दिपोत्सवाने केली जाते. कोल्हापुरातील पंचगंगा नदी घाटावर गेल्या ५० वर्षांपासून हा दिपोत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू आहे. शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या दिपोत्सवासाठी सोमवारी रात्रीपासूनच जोरदार तयारी सुरू झाली होती. मंगळवारी पहाटे पावणे चार वाजता दिवे लावण्यास सुरुवात करण्यात आली. नदी घाटावरील सर्व मंदिरे, दिपमाळा, घाटावरील पायऱ्या आणि शिखर यावर कार्यकर्त्यांनी दिवे लावले, तर नदी पात्रातील दिवे व्हाईट आर्मीच्या जवानांनी लावले.

याशिवाय मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांनीही आपल्या वतीने हजारो दिवे प्रज्वलित केले. या धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्यात महिलांचा सहभाग विशेष लक्षणीय आणि मोठ्या प्रमाणात होता. तसेच शिवाजी पुलावर करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईने या दिपोत्सवाच्या शोभेत अधिकच भर घातली. या प्रसंगी स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, नगरसेवक राहुल माने, डॉ. प्रविण कोडोलीकर तसेच शिवमुद्रा प्रतिष्ठानचे संदीप देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

शंकराच्या मूर्तीचे आकर्षण

यंदाच्या दिपोत्सवात मस्कुती तलाव येथील मंडळाची १५ फुटी भगवान शिवशंकराची मनोहारी मूर्ती पंचगंगा नदी घाटावर ठेवण्यात आली होती. या भव्य मूर्तीचे उपस्थितांसाठी आणि भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरले.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *