पुणे: बारामती परिसरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत गंभीर! पोलिसांत सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा सुप्रिया सुळे

पुणे: बारामती शहर आणि परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून, या भागात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे, अशी तीव्र चिंता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. बारामती व राज्यातील बिघडत्या कायदा-सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आणि गृह विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

खंडणी, गोळीबार आणि दहशतीचे वातावरण

बारामती एमआयडीसी परिसरातील बांधकाम व्यावसायिक राजन कोळेकर यांच्या गाडीवर आणि घराच्या आवारात झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर सुप्रिया सुळे यांनी या विषयावर आक्रमक भूमिका घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, व्यावसायिकाकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती आणि त्यानंतर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी थेट घराचे गेट उघडून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ आणि पार्श्वभूमी समोर आल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त करत, एका व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकावून थेट घरासमोर येऊन गोळीबार करणे हा प्रकार अत्यंत संतापजनक असल्याचे म्हटले आहे.

'पूर्वी कधीही न घडणाऱ्या घटना आता बारामतीत घडताहेत'

सुप्रिया सुळे यांनी नमूद केले की, बारामती तालुक्यात आणि शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असून, पूर्वी कधीही न घडणाऱ्या घटना आता घडू लागल्या आहेत. यामुळे स्थानिक व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीती व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. "नेमके बारामती पोलीस काय करत आहेत? गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही का?" असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, कायदा व सुव्यवस्थेची स्थिती सुधारण्यासाठी आपण मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक तसेच पुणे शहर पोलीस आयुक्तांकडे सातत्याने हा विषय मांडत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

तपासाची मागणी आणि आंदोलनाचा इशारा

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची तातडीने आणि गांभीर्याने दखल घेऊन सखोल तपास करावा, खंडणी मागणाऱ्या आणि गोळीबार करणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळाव्यात आणि त्यांची दहशत कायमची मोडून काढावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांना धमकावण्याचे व त्यांच्यावर हल्ले करण्याचे प्रकार कोणत्याही परिस्थितीत तातडीने थांबले पाहिजेत. पोलिसिंग आणि जलद प्रतिसाद यंत्रणेत सुधारणा न झाल्यास पक्षाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *