नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!

नांदेड: हलाखीच्या कौटुंबिक परिस्थितीशी दोन हात करत मोठ्या शहरात स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका निष्पाप कष्टकरी तरुणाचा एका क्षुल्लक अपघातातील धमक्यांमुळे अतिशय दुर्दैवी अंत झाला आहे. पुण्यात काम करणाऱ्या हदगाव तालुक्यातील कवाना येथील मंगेश राजू ढाके (वय २२) या तरुणाच्या दुचाकीचा धक्का रस्त्यावरील एका उभ्या फॉर्च्यूनर गाडीला लागल्याने, वाहन चालकाने त्याला बेदम मारहाण करून गाडीची चावी हिसकावून घेतली आणि हजारो रुपयांच्या नुकसान भरपाईचा तगादा लावला. आधीच दारिद्र्यात जगणाऱ्या मंगेशने "आता एवढे पैसे कुठून आणायचे?" या प्रचंड मानसिक दहशतीतून आपल्या भाड्याच्या खोलीवर गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. २ नोव्हेंबर रोजी पुण्यात घडलेल्या या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण नांदेड जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

आईचे छत्र हरपले, संघर्षातून नुकतीच घेतली होती दुचाकी
मंगेश ढाके याचे कुटुंब अतिशय गरिबीत जगत होते. लहान वयातच आईचे निधन झाल्यानंतर वडिलांनी दुसरे लग्न केले होते. घराची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने कुटुंबावर भार न बनता मंगेश पुण्यात आला होता. तिथे मिळेल ते अंगमेहनतीचे काम करून तो आपली उपजीविका चालवत होता. स्वतःच्या घामाच्या पैशातून बचत करून त्याने नुकतीच एक दुचाकी खरेदी केली होती. ही दुचाकी म्हणजे त्याच्या रोजच्या संघर्षाचे आणि स्वावलंबनाचे प्रतीक बनली होती.

फॉर्च्यूनर चालकाची मुजोरी; चावी हिसकावून केली मारहाण
२ नोव्हेंबर रोजी पुण्यात कामावरून जात असताना मंगेशच्या दुचाकीचा एका उभ्या असलेल्या फॉर्च्यूनर कारला किरकोळ धक्का लागला. या अपघातात फॉर्च्यूनरचे हलके नुकसान झाले. मात्र, गाडीच्या चालकाने व मालकाने मंगेशला कोणतीही सहानुभूती न दाखवता रस्त्यावरच बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, त्याची हक्काची दुचाकी जागेवरच जप्त करत चावी काढून घेतली आणि गाडीचे झालेले नुकसान भरून देण्याची मागणी करत मंगेशला सज्जड दम भरला.


पैसे कुठून आणायचे? प्रचंड धास्तीतून संपवले जीवन
हातातून गाडी गेली आणि डोक्यावर महागड्या फॉर्च्यूनरच्या भरपाईचे भूत नाचू लागल्याने मंगेश पूर्णपणे खचून गेला. खिशात दमडी नसताना आणि पाठीशी कोणाचाही आधार नसताना एवढी मोठी रक्कम कुठून आणायची, या विवंचनेने त्याला ग्रासले. मानसिक संतुलन ढासळलेल्या मंगेशने थेट आपल्या खोलीवर जाऊन गळफास लावून घेतला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला.

कवाना गावात आक्रोश; अंत्यविधी संपन्न
पुण्यातील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मंगेशचे पार्थिव ३ नोव्हेंबर रोजी हदगाव तालुक्यातील त्याच्या मूळ गावी कवाना येथे आणण्यात आले. कष्टाळू मुलाचा असा अनपेक्षित आणि वेदनादायी अंत पाहून संपूर्ण कवाना गाव सुन्न झाले होते. मंगळवारी शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मंगेशच्या पश्चात वडील, आई, दोन भाऊ आणि दोन बहिणी असा मोठा परिवार आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *