रत्नागिरी: लांजा तालुक्यात खळबळ! घरात एकट्या असलेल्या वृद्धेचा संशयास्पद मृत्यू, हातातील सोन्याच्या बांगड्या बळजबरीने चोरल्याने मोठी सनसनाटी

रत्नागिरी: जिल्ह्यातील लांजा तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. वेरवली बुद्रुक गावातील लाडवाडी-रामगाव येथे घरात वृद्ध महिला एकटीच असल्याचा फायदा घेत चोरट्याने तिच्या हातातील सोन्याच्या बांगड्या जबरदस्तीने चोरून नेल्याची घटना घडली. विशेष म्हणजे, या चोरीच्या प्रकारानंतर ती वृद्धा घरात मृतावस्थेत आढळून आल्यामुळे संपूर्ण परिसरात मोठी सनसनाटी पसरली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका संशयिताला ताब्यात घेतले असून पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

प्राप्त माहितीनुसार, मृत पावलेल्या वृद्ध महिलेचे नाव वैशाली विलास हेगिष्ट्ये (वय ७६) असे आहे. त्या त्यांची मुलगी पल्लवी यांच्यासोबत या घरी राहत होत्या. परिसरातील वेरवली खुर्द येथील राहणारा प्रमोद प्रकाश खेडेकर याने या माय-लेकींना चिकाचे दूध देण्याचे सांगितले होते. त्यानुसार, सोमवारी सकाळी १०:३५ वाजण्याच्या सुमारास पल्लवी हेगिष्ट्ये या दूध आणण्यासाठी प्रमोद खेडेकर यांच्या वेरवली खुर्द येथील घरी गेल्या होत्या. त्यानंतर सुमारे एक तासाने, म्हणजेच सकाळी ११:३५ वाजण्याच्या दरम्यान दूध घेऊन पल्लवी परत आपल्या घरी आल्या.

घरी आल्यावर त्यांनी पाहिले की, त्यांची आई वैशाली या खोलीमध्ये जमिनीवर निपचित पडलेल्या अवस्थेत आहेत. आईच्या दोन्ही हातांमधील सोन्याच्या बांगड्या गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तसेच आईच्या हातावर ओरबडल्याच्या आणि जखमांच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या, ज्यावरून कोणीतरी जोर-जबरदस्ती करून त्या बांगड्या ओढून घेतल्याचे स्पष्ट झाले. हा भयानक प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने गावचे पोलीस पाटील यांना या संपूर्ण घटनेची माहिती दिली.

पोलीस पाटील प्रभाकर कुल्ये यांनी तत्काळ लांजा पोलिसांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीळकंठ बगळे, पोलीस उपनिरीक्षक अमोद सरंगले, सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय मारळकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी फॉरेन्सिक मोबाईल व्हॅन आणि मोही श्वान (डॉड स्कॉड) पथकालाही पाचारण केले होते. याप्रकरणी मृत वृद्धेची मुलगी पल्लवी हेगिष्ट्ये हिने दिलेल्या फिर्यादीवरून लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, वैशाली हेगिष्ट्ये यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? हा घातपात आहे की हृदयविकाराचा झटका? याचे नेमके कारण शवविच्छेदन (Post-mortem) अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. या दुर्दैवी घटनेबाबत आणखी एक माहिती समोर आली आहे ती म्हणजे, हेगिष्ट्ये कुटुंबिय गावी गणपती उत्सवासाठी आले होते. गणेशोत्सवानंतर घरातील इतर मंडळी मुंबईला परत गेली होती, परंतु वैशाली आणि त्यांची मुलगी पल्लवी या दोघीच गावी थांबल्या होत्या. येत्या दसऱ्याचा सण साजरा करून माय-लेकी मुंबईला जाणार होत्या, परंतु त्यापूर्वीच घडलेल्या या अघटित घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *