पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक

पुणे: मुकुंद नगर आणि महर्षी नगर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एमबीए (MBA) चे शिक्षण पूर्ण केलेल्या आणि आयटी क्षेत्रात काम केलेल्या २९ वर्षीय विवाहिता पायल झांबरे यांनी सासरच्या जाचाला आणि सततच्या हुंड्याच्या मागणीला कंटाळून स्वतःचे आयुष्य संपवले आहे. या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी तातडीने कारवाई करत पायल यांचा पती अक्षय झांबरे याला अटक केली असून सासू, सासरे आणि नणंद यांच्याविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

पायल यांचा विवाह पुण्यातील व्यावसायिक कुटुंबातील अक्षय झांबरे यांच्याशी झाला होता. पायल यांच्या माहेरच्या नातेवाइकांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नानंतरपासूनच सासरच्या मंडळींकडून पायल यांचा सतत मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. विशेषतः दरवर्षी ऐन दिवाळीच्या सणाला माहेरून ५ ते १० तोळे सोने आणण्यासाठी त्यांच्यावर मोठा दबाव आणला जात होता. चालू वर्षी दुष्काळी परिस्थिती आणि आर्थिक अडचण असल्यामुळे माहेरच्या लोकांनी सोने देण्यास असमर्थता दर्शवली होती व पुढील वर्षी सोने देण्याचे आश्वासन दिले होते. यावरून सासरच्यांनी पायल यांचा छळ अधिक तीव्र केला होता.

याशिवाय, २०२२ मध्ये पायल गरोदर असताना सासरच्या मंडळींनी मुलगाच जन्माला यावा यासाठी त्यांच्यावर अमानुष दबाव आणला होता. ३० मार्च २०२३ रोजी पायल यांनी एका मुलीला जन्म दिल्यानंतर, सासू आणि सासरच्या लोकांनी रुग्णालयात जाऊन वाद घातला आणि बाळ तसेच पायल यांची जबाबदारी घेण्यास स्पष्ट नकार दिला होता. रविवारी सासूशी झालेल्या तीव्र भांडणानंतर पायल बेपत्ता झाल्या होत्या आणि सोमवारी सकाळी त्यांचा मृतदेह नजीकच्या एका अपार्टमेंटमधील बंद खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. मृत्युपूर्वी त्यांनी "माझ्यासोबत काहीही वाईट घडल्यास सासू जबाबदार असेल" असा संदेश पाठवला होता, असा दावा माहेरच्यांनी केला आहे.

पायल यांच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांच्या माहेरच्या संतप्त नातेवाइकांनी आणि १५ ते २० लोकांच्या टोळक्याने महर्षी नगर येथील सासरच्या मालकीच्या 'झांबरे पॅलेस' या मंगल कार्यालयावर आणि निवासस्थानावर धाव घेऊन तुफान तोडफोड केली. या तोडफोडीत कार्यालयातील वस्तूंचे मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच स्वारगेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०८ (आत्महत्यूस प्रवृत्त करणे), ८५ (क्रूरता), ३५१(२), ३५२ आणि हुंडा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पती अक्षयला अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *