रत्नागिरी: गुहागरात शृंगारतळी-आबलोली रस्त्याकडेला आढळले बिबट्याचे मादी पिल्लू; वनविभागाच्या पथकाने केले सुरक्षित रेस्क्यू!

रत्नागिरी: जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील मौजे वेळंब (नालेवाडी) परिसरात शृंगारतळी ते आबलोली रस्त्याकडेला सापडलेल्या बिबट्याच्या मादी पिल्लास वनविभागाच्या पथकाने तत्परतेने कारवाई करत सुरक्षितपणे ताब्यात घेतले आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत हे पिल्लू पूर्णपणे सुस्थितीत असल्याचे स्पष्ट झाले असून, घटनेनंतर परिसरात नागरिकांमध्ये विविध चर्चा रंगल्या होत्या.

रस्त्याकडेला पिल्लू दिसल्याची माहिती; वनविभागाची तत्पर कारवाई

सोमवारी सकाळी गुहागर तालुक्यातील मौजे वेळंब (नालेवाडी) परिसरातील शृंगारतळी ते आबलोली मार्गाच्या बाजूला बिबट्याचे पिल्लू आढळून आल्याची माहिती बाळकृष्ण ओक यांनी तात्काळ वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीचा आढावा घेत पिल्लास सुरक्षितपणे आपल्या ताब्यात घेतले.

वैद्यकीय तपासणीत पिल्लू सुस्थितीत; वय ४ ते ५ महिने

वनविभागाने ताब्यात घेतल्यानंतर या बिबट्याच्या पिल्लाची पशुधन विकास अधिकारी जाणवले यांच्याकडून सखोल वैद्यकीय तपासणी करण्यात आली. प्राथमिक तपासणीत हे पिल्लू मादी जातीचे असून त्याचे वय अंदाजे चार ते पाच महिने असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच पिल्लू पूर्णपणे सुस्थितीत असल्याची खात्री वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात यशस्वी बचाव मोहीम

हे यशस्वी बचाव कार्य विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड आणि चिपळूणचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. खान यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या मोहिमेत गुहागरचे वनपाल अमित निमकर, रानवीचे वनरक्षक गायकवाड, अडूरचे वनरक्षक मांडवकर आणि आबलोलीचे वनरक्षक पवार यांनी सक्रिय सहभाग घेत पिल्लास सुरक्षितरित्या ताब्यात घेतले. कोकण आणि रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण व डोंगराळ भागात वन्यजीवांचा वावर वाढत असताना वनविभागाच्या या समयसूचक कारवाईचे समाधान व्यक्त केले जात आहे.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *