नाशिक: महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये मोठा भूकंप! शहराध्यक्षांचा राजीनामा घेतला, ठाकरे गटाचे दोन उमेदवार नियुक्त

नाशिक: महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकपदाच्या निवडीवरून भाजपमधील अंतर्गत मतभेद आणि वाद पुन्हा एकदा तीव्रपणे चव्हाट्यावर आले आहेत. या संपूर्ण प्रकरणात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आक्रमक पवित्रा घेत भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांचा राजीनामा घेतला असल्याची मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. दुसरीकडे, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकूण १० स्वीकृत नगरसेवकांची नावे अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून, त्यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या दोन उमेदवारांचाही समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीबाबत अंतिम केलेली यादी आणि नावे प्रदेश नेतृत्वाला विश्वासात न घेता किंवा योग्य पद्धतीने कळवली न गेल्याचा मुद्दा ऐरणीवर आला. निश्चित करण्यात आलेल्या उमेदवारांबाबत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण अनभिज्ञ असल्याचे समोर आल्यानंतर त्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली. त्यातच इच्छुकांनी केलेल्या तक्रारींचीही भर पडल्याने प्रदेशाध्यक्ष नाराज झाले आणि त्यांनी सुनील केदार यांना मुंबईला बोलावून घेत शहराध्यक्षपदाचा राजीनामा घेतल्याचे सांगितले जात आहे.

यापूर्वी महापालिका निवडणुकीच्या काळातही भाजपच्या काही एबी अर्जांच्या पळवापळवीवरून आणि इच्छुकांच्या नाराजीवरून नाशिकमधील पक्षांतर्गत धुसफूस दिसून आली होती. त्यानंतर आता स्वीकृत नगरसेवक निवडीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कारवाईमुळे नाशिक भाजपमधील अंतर्गत वाद अधिकच उफाळून आला आहे.

दरम्यान, महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पक्षीय संख्याबळानुसार एकूण १० स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर करण्यात आली. यामध्ये भाजपचे चंद्रशेखर पंचाक्षरी, संदीप लेनकर, हेमंत धात्रक, रामहरी संभेराव, रोहिणी नायडू आणि अजित चव्हाण अशा सहा जणांचा समावेश आहे. तसेच शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाचे चंद्रकांत लवटे आणि बाबुराव आढाव, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे बाबासाहेब गायकवाड आणि हेमंत गायकवाड यांची स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली. या सर्व नवनियुक्त स्वीकृत नगरसेवकांना महापौर आणि उपमहापौर विलास शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *