मुंबई: ओव्हरटेक करण्याच्या वादातून फिटनेस ट्रेनरच्या गाडीची तोडफोड; वांद्रे तलाव परिसरात हाणामारी

मुंबई: वांद्रे परिसरात ओव्हरटेक करण्यावरून झालेल्या एका वादाचे पर्यावसान वाहनाच्या तोडफोडीत आणि हाणामारीत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ९ ऑगस्ट रोजी रात्री ही घटना घडली असून, सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अर्जुनजित गरेवाल (३९) हे आपल्या पत्नीसोबत प्रवास करत असताना त्यांना काही अनोळखी व्यक्तींच्या रोषाला सामोरे जावे लागले.

नेमकी घटना काय? रविवारी रात्री सुमारे ११:४५ च्या सुमारास अर्जुनजित गरेवाल हे आपली पत्नी भक्तीसोबत 'थार' गाडीतून माहिमच्या दिशेने निघाले होते. एस.व्ही. रोडवरून प्रवास करत असताना, गरेवाल यांनी एका वाहनाला ओव्हरटेक केले. या घटनेवरून संबंधित गाडीतील चालकाचा आणि त्यांच्यात वाद झाला. समोरच्या गाडीत ६ ते ७ पुरुष होते. त्या गाडीने पुन्हा पुन्हा गरेवाल यांच्या गाडीला ओव्हरटेक करून त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला.

वांद्रे तलाव परिसराजवळ पोहोचताच, आरोपींनी आपली गाडी अचानक गरेवाल यांच्या थारसमोर उभी करून रस्ता अडवला. आरोपींमधील एका व्यक्तीने खाली उतरून शिवीगाळ करत गरेवाल यांना गाडीतून खाली येण्यास भाग पाडले. अर्जुनजित गरेवाल खाली उतरताच आरोपीने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी दोन दुचाकींवरून आलेल्या आणखी दोन व्यक्तींनीही त्यांना शिवीगाळ केली.

यातील करड्या रंगाचा शर्ट घातलेल्या एका व्यक्तीने बेसबॉल स्टिक काढली आणि गरेवाल यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. गरेवाल यांनी हाताने हा वार रोखला, परंतु त्यानंतर आरोपीने त्याच बेसबॉल स्टिकने त्यांच्या थार गाडीच्या समोरील, मागील आणि ड्रायव्हरच्या बाजूच्या काचा फोडल्या. या भयानक प्रकारामुळे गाडीत बसलेली त्यांची पत्नी प्रचंड घाबरली होती. घटना घडल्यानंतर सर्व आरोपी तेथून पसार झाले. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अज्ञातांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.



राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *