यवतमाळ: बाबूजींच्या २९व्या स्मृतीदिनानिमित्त सुरांची स्वरांजली आणि मान्यवरांची उपस्थिती अमित कुमार व बोमन इराणी येणार यवतमाळमध्ये!

यवतमाळ: ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा ज्येष्ठ पत्रकार आणि संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचा २९ वा स्मृती समारोह बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी यवतमाळ येथे आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच मंगळवार, २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजता प्रेरणास्थळ, दर्डा उद्यान येथे महान गायक व अभिनेते किशोर कुमार यांचा संगीताचा वारसा पुढे चालविणारे प्रख्यात गायक अमित कुमार संगीतमय स्वरांजली अर्पण करणार आहेत.

बाबूजी हे शास्त्रीय संगीताचे अत्यंत चाहते होते. सुश्राव्य संगीत, तसेच सदाबहार गाणी आणि गझल यामध्ये त्यांना विशेष रुची होती. त्यामुळेच दरवर्षी त्यांच्या आठवणीत स्मृतिदिनी संगीतमय आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदा अमित कुमार हे सुरेल हिंदी गीतांचा कर्णमधुर नजराणा सादर करतील. अमित कुमार यांनी अगदी लहानपणापासूनच गायनास सुरुवात केली. १९६५ मध्ये किशोर कुमार यांनी निर्मित केलेल्या 'दूर गगन की छांव मे' या चित्रपटात त्यांनी बाल कलाकाराची भूमिका केली होती आणि गाणेही गायले होते. येथूनच त्यांच्या गायन प्रवासाला सुरुवात झाली. त्यानंतर १९७०, १९८० आणि १९९० च्या दशकात बॉलीवूडमध्ये त्यांची अनेक गाणी सुपरहिट ठरली.

दिवंगत संगीतकार आर.डी. बर्मन यांच्यासोबत त्यांची जोडी विशेष गाजली. १९८२ मध्ये त्यांना 'लव्ह स्टोरी' या चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. विशेष म्हणजे या पुरस्कारासाठी त्यांचे नामांकन त्यांचे वडील किशोर कुमार यांच्यासोबत झाले होते, जो आजतागायत एक विक्रम मानला जातो. हिंदी सोबतच त्यांनी बंगाली, मराठी, भोजपुरी आणि ओडिया तसेच इतर भारतीय भाषांमध्ये गाणी गायली आहेत. गायनासोबतच ते एक उत्तम संगीत दिग्दर्शक आणि अभिनेते देखील आहेत. आजही त्यांचे देश-विदेशात लाइव्ह कॉन्सर्ट्स आणि संगीताचे कार्यक्रम होतात.

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता बोमन इराणी यांच्या उपस्थितीत २५ रोजी प्रेरणास्थळावर आदरांजली

ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचा २९ वा स्मृती समारोह बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी आहे. या निमित्ताने प्रेरणास्थळ, दर्डा उद्यान येथे सकाळी ९ ते १०:१५ या वेळेत अभिवादन सभा होईल. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता बोमन इराणी यांची उपस्थिती लाभणार असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली बाबूजींच्या जीवनकार्याला आणि मूल्यांना उजाळा दिला जाणार आहे.

 



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *