अमरावती: बाळ विक्री प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत! चौथे बालक सुखरूप ताब्यात, दाम्पत्याला अटक; तपासातून धक्कादायक खुलासे

अमरावती: शहरातील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आलेल्या बहुचर्चित नवजात बाळ खरेदी-विक्री प्रकरणाचा तपास आता वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये विस्तारत चालला आहे. या प्रकरणात पोलिसांनी अकोला जिल्ह्यातून चौथ्या बालकाला सुरक्षित ताब्यात घेतले असून, संबंधित बालकाच्या पालक दाम्पत्यालाही अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत या संपूर्ण रॅकेटमधून चार बालकांची सुटका करण्यात पोलिसांना यश आले असून, या प्रकरणात एकूण १३ जणांना अटक करण्यात आली आहे. तपासाची व्याप्ती पाहता आणखी काही जणांचा सहभाग समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आतापर्यंत चार बालके सुरक्षितपणे पोलिसांच्या ताब्यात आली असून, उर्वरित दोन बालकांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रकरणातील पहिले बालक गुन्हा दाखल झाला तेव्हाच १९ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर १८ नोव्हेंबर २०२६ रोजी वर्धा जिल्ह्यातून दुसरे बालक, १९ नोव्हेंबर २०२६ रोजी अमरावती जिल्ह्यातून तिसरे बालक आणि शुक्रवारी २० नोव्हेंबर २०२६ रोजी अकोला जिल्ह्यातून चौथे बालक शोधून काढत सुरक्षित ताब्यात घेण्यात आले आहे.

या रॅकेटचे धागेदोरे अमरावतीसह वर्धा आणि अकोला या तीन जिल्ह्यांपर्यंत पोहोचल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात आतापर्यंत डॉ. वैशाली भोजने, प्रफुल्ल भोजने, मयूर धांडगे, एक विधिसंघर्षग्रस्त बालक, निर्मल सरदार, दोन महिला तसेच वर्धा, अमरावती आणि अकोला जिल्ह्यांतील प्रत्येकी तीन महिला-पुरुष पालकांना अटक करण्यात आली आहे.

मुख्य आरोपी डॉ. वैशाली प्रफुल्ल भोजने (वय ४९) आणि तिचा पती प्रफुल्ल वसंतराव भोजने (वय ५६, रा. बूटी प्लॉट, राजापेठ, अमरावती) यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. पोलीस कोठडीदरम्यान डॉ. वैशाली भोजने हिने दिलेल्या जबाबात कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता पालकांच्या परस्पर संमतीने एकूण सहा बालकांची देवाणघेवाण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

भोजने दाम्पत्याला न्यायालयाने २३ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, शुक्रवारी अटक करण्यात आलेल्या अकोल्यातील पालक दाम्पत्याला न्यायालयात हजर केले जात आहे. पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त शाम घुगे आणि सहायक पोलीस आयुक्त नयन आलुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली फ्रेजरपुरा पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत. उर्वरित दोन बालकांचा शोध घेणे आणि या प्रकरणातील आर्थिक व्यवहार व अन्य सहभागींची माहिती मिळवणे, या दिशेने पोलिसांची तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *