पुण्यात एफडीएची मोठी कारवाई! दिवाळीच्या पार्श्वभूमीवर १० ठिकाणी छापे, ९ लाख ३९ हजारांचा मिठाई साठा जप्त!

दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या मिठाई उत्पादक आणि विक्रेत्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आक्रमक भूमिका घेतली आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि लगतच्या ग्रामीण भागातील एकूण १० हून अधिक ठिकाणी एफडीएच्या पथकांनी धडक कारवाई करत मोठे छापे टाकले. या विशेष मोहिमेदरम्यान तब्बल ९ लाख ३९ हजार रुपये किमतीचा निकृष्ट आणि संशयास्पद खाद्यपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून, त्यापैकी सुमारे दीड हजार किलोहून अधिक अस्वच्छ व दूषित अन्नपदार्थ जागीच नष्ट करण्यात आले आहेत.

विविध भागांत धाडी आणि जप्त करण्यात आलेला माल:

एफडीएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या तोंडावर बाजारपेठेत मिठाई, खवा, रबडी आणि फराळाच्या पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते. याचा गैरफायदा घेऊन अनेक व्यावसायिक निकृष्ट दर्जाचा माल बाजारात विकतात. प्रशासनाने मुळशी तालुक्यातील माण गावातील 'चामुंडा मा रबडीवाला' येथे छापा टाकून ४८६ किलो रबडी आणि रसगुल्ला जप्त केला, ज्याची किंमत १ लाख ७५ हजार रुपये होती. हा सर्व साठा अत्यंत अस्वच्छ वातावरणात आणि चुकीच्या पद्धतीने साठवण्यात आला होता.

तसेच, शिखरापूर येथील 'श्री गणेश लाडू वाले' येथे कारवाई करत ६०५ किलो लाडू व म्हैसूर पाक जप्त करण्यात आला, ज्याचे मूल्य १ लाख २५ हजार रुपये होते. येथे कोणतीही कायदेशीर परवानगी किंवा परवाना नसताना विनापरवाना मिठाई तयार केली जात असल्याचे उघडकीस आले. मंचर येथील 'राजमिलान स्वीट्स'मधून २५० किलो मिठाई बनवण्याचा खवा (मावा) जप्त करून तो नष्ट करण्यात आला. खेड तालुक्यातील शिरोली येथील 'अंबिका फूड्स' या उत्पादन केंद्रावर छापा टाकून ६४८ किलो सोनपापडी जप्त करण्यात आली असून, या केंद्राचा परवाना देखील तात्काळ निलंबित करण्यात आला आहे. याशिवाय पिंपळे सौदागर येथील 'भैल स्वीट्स' आणि काळेवाडी येथील 'पुणेरी स्वीट्स'मधूनही नियमबाह्य व निकृष्ट अन्नपदार्थ जप्त करून कारवाई करण्यात आली आहे.

प्रशासनाचा कठोर इशारा:

अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या, साठवणुकीसाठी योग्य तापमान न पाळणाऱ्या किंवा लेहबिंग नसलेल्या उत्पादनांची विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर बडगा उगारला जाईल. काही दुकानदारांचे परवाने निलंबित करण्यात आले असून काहींना व्यवसाय बंद करण्याच्या सक्त नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. सणासुदीच्या काळात नागरिकांनी अन्नपदार्थ खरेदी करताना दर्जाविषयी खात्री बाळगावी आणि काही संशयास्पद आढळल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन एफडीएच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *