बलराज संघई यांचा कॉलम:ईमोजी नव्हे शब्दच, शब्द हेच अभिव्यक्तीचे प्रभावी साधन

शब्द हेच परस्पर संवादांचे स्पष्ट माध्यम असतात. प्राचीन काळापासून शब्दा द्वारेच संवाद साधला जायचा. मग तो शब्द अक्षरात्मक असो अथवा अनक्षरात्मक. सर्व जीव, प्राणी आपसात आणि परस्परात शब्द आणि ध्वनी द्वारे भावना व्यक्त करतात. संवादासाठी शब्दाइतके प्रभावी माध्यम जगात अजून तरी सापडलेले नाही. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी ज्याला धन आणि रत्न आणि शस्त्र म्हटले ते शब्दच : आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने । शब्दांचीच शस्त्रे यत्न करू ।। शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन । शब्द वाटू धन जनलोका ।। तुका म्हणे पहा शब्दचि हा देव । शब्देची गौरव पूजा करू ।। जगद्गुरु संत तुकाराम महाराज प्रत्यक्ष ज्यास धन, रत्न, शस्त्र इतकेच नव्हे तर देवा पर्यंतच्या उपमा देऊन सत्कार करतात तेच शब्द. त्या शब्दांना स्वतःची संपूर्ण अभिव्यक्ती करण्यासाठी वेड्या-वाकड्या मुद्रा, हसरी रडकी गोल चित्र मागेपुढे लावून घ्यायची आवश्यकता नाही असे मला वाटते. ऋषीमुनींपासून ईश्वरीय ज्ञान आणि वेदज्ञान, शास्त्रज्ञान शब्दांच्याद्वारेच आपल्यापर्यंत पोहोचले संकेताद्वारे नव्हे. आज-काल बदलत्या युगामध्ये संवादाची साधने बदलली त्याचप्रमाणे भाषेमध्येही काही संकेतात्मक चिन्ह व्यक्त झाली आहेत, ज्यांना आपण गोंडस ईमोजी असे म्हणतो. हे हसरे रडके चेंडू शब्दांच्या मागे पुढे खेळताना दिसतात. पण त्यांची शब्दांशी तुलना व्हावी इतकी त्यांची पात्रता नाही असे वाटते. मोबाईल किंवा त्यातील सुधारणांमुळे जशी व्यवहारांमध्ये सुविधा वाढली तसेच काही त्रुटी सुद्धा निर्माण झाल्या, जवळीक वाढली आणि दुरावा सुद्धा. एका घरात आज परस्पर संवादाची जागा तो मोबाईल फोन आल्यापासून व्हाट्सअप वगैरे या ॲप म्हणतात त्यांनी घेतली. मग त्यामध्ये हे तात्पुरते विविध भावना व्यक्त करणारे गोल छोटी बोलकी चित्र आली. आणि ज्यामुळे हळूहळू एकमेकांशी खरा संवाद बंद होत आहे, त्याला जबाबदार असलेल्या या मोबाईल आणि ॲप मध्ये या ईमोजी नावाच्या संकेत चित्रांनी शब्दांची स्पर्धा करत अभिव्यक्तीचे माध्यम व्हायला सुरुवात केली. पण खरंच ते इतके सक्षम आहेत का? लोकांनी चक्क यांना अधिक वापरात आणून हे हसरे, रडके ,बोलके चित्र टाकायला सुरुवात केली. प्रत्यक्ष भेटायची गरज मोबाईल मुळे बऱ्याचशा प्रमाणात संपुष्टात आली आज-काल समारंभाच्या पत्रिका देखील छापून वाटणे बंद झाले. त्यानिमित्ताने प्रत्यक्ष होणारी भेट या लोकप्रिय ॲपने संपुष्टात आणली. परंतु उरली सुरली संवादाची गरज अँप मध्ये जमा झालेल्या या संकेत चित्रांनी मोडीत काढली. याबाबतीत काही जणांचे म्हणणे असे येते की वेळेअभावी एखाद्या संदेशावर ईमोजी द्वारा अत्यंत द्रुत गतीने व्यक्त होता येते. याचा अर्थ तेथे शब्दाची जागा ते गोल संकेत चित्र घेतात. आणि तेवढ्यावर भागून जाते. पण त्यामुळे संवाद बंद होत आहेत. असे व्हायला नको. वेड्या बावी कधीतरी हे वापरले तर ठीक. उरली सुरली संवादाची अपेक्षा जी असते ती याप्रकारे भरून जाते. विचार करण्याची गोष्ट ही आहे की त्याने शब्दांची बरोबरी होते का? अर्थात नक्कीच नाही. शब्दांच्या मागे अनमोल, अबोल भावना असतात. प्रत्यक्ष भेट झाली नाही तरी एखादा संदेश दिल्यानंतर त्याला शब्दाद्वारे आलेले उत्तर खूप आपुलकीचे वाटते तितके ते या ईमोजी नावांच्या चित्रांमुळे जवळचे वाटत नाही. संपूर्ण जग एका मोठ्या गतीने पुढे जात आहे, दररोज नवनवीन शोध आणि गरजा निर्माण होत आहेत. सर्व स्पर्धांमध्ये बरोबरी करत आपला पाय पुढे पडत असताना आलेल्या सुधारणा आणि ते ' सो कॉल्ड सोफेस्टिकेशन्स ' याद्वारे सर्वांसारखे पळावे लागत आहे. मग प्रसारमाध्यमांमध्ये ज्याप्रकारे अभिव्यक्ती होत आहे त्यामध्येही स्वतःला समाविष्ट करून घेताना ईमोजी वगैरे या प्रकारे सर्रास अभिव्यक्ती होत आहेत. माझ्या लहानपणी मी ऐकत होतो की मुंबई पुण्यामध्ये ड्युटीला जाताना लोक चौकात कोपऱ्यावर गाड्यावर कुठेतरी पटकन वडापाव घेऊन ते खात खात पुढे जातात. ती काळाची गरज होती. आता प्रथा बनली आहे. आज आवडीने फास्ट फूड चा आस्वाद घेतला जात आहे. घरून नाश्ता बनवून द्यायची बला टळली. परंतु विचार करण्याची ही गोष्ट आहे की फास्ट फूड हे जेवणाची जागा घेऊ शकत नाही. दिवसभर खाल्लेले वडापाव एका घरगुती थाळीची बरोबरी नाही करू शकत. शेवटी जेवणच करावे लागते. त्याचप्रमाणे हे मूठभर ईमोजी वापरून झालेली अभिव्यक्ती शब्दांची बरोबरी करू शकत नाही. आज अत्यंत शॉर्टकट, थोडक्यात,आपल्या सुविधेने दुसऱ्याला अल्प अशी दाद देण्याची सर्वोत्तम सोय झालेली आहे ती या ईमोजीद्वारे. कधी कधी घाई गडबडी मध्ये एखाद्या संदेशाला भलते चुकीचे ईमोजी जातात आणि समोर गैरसमज होतात. समोरून आलेली नाराजी मात्र नंतर शब्दाद्वारेच निस्तारावी लागते. संवादातील अभिव्यक्ती मध्ये उतरणारे हे ईमोजी मात्र तांत्रिक आहेत, तर प्रत्यक्ष शब्द हे सोबत भावना घेऊन आलेले आलेले असतात. एका ईमोजीद्वारे अल्प अभिप्राय देताना मात्र टचस्क्रीन मध्ये आलेला असतो तर शब्दाने व्यक्त होताना त्यातल्या स्पष्ट भावना कळतात आणि पोहोचतात सुद्धा. म्हणून शब्द हे काळजापासून निघालेले श्वासासोबतचे हुंकार भावनेला घेऊन दुसऱ्याच्या काळजाला भिडत असतात. आणि अभिव्यक्तीचे प्रभावी माध्यम तेच आपुलकीचे शब्द सर्वांनी अंगीकारावे असे माझे मत आहे. शब्दांपेक्षा त्या हसऱ्या, लाडक्या, रडक्या वेड्या,वाकड्या गोल चित्रांना अधिक महत्त्व देऊ नये. अखेर समृद्ध भाषेचे रत्न, अलंकारा समान शब्द भांडार आपल्याकडे असताना, अमृताशी पैजा जिंकणारी भाषा आपल्या मुखात शब्दांच्याद्वारे विद्यमान आहे. म्हणून शब्दानेच संवाद साधा. आणि शब्दाद्वारेच व्यक्त व्हा. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) (संपर्क- 9420015108)

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *