सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव

सातारा: महाबळेश्वरमध्ये गेल्या २४ तासांत तब्बल ५१३ मिमी (सुमारे २० इंच) पावसाची नोंद झाली असून, हा गेल्या शतकातील सर्वाधिक पावसांपैकी एक मानला जात आहे. विक्रमी पावसामुळे महाबळेश्वरसह सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील डोंगराळ भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

सततच्या मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले, ठिकठिकाणी दरडी कोसळल्या, झाडे उन्मळून पडली आणि काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला. घाटरस्त्यांवर मातीचे ढिगारे आणि मोठे दगड आल्याने अनेक मार्ग बंद झाले असून काही गावांचा संपर्कही तुटला आहे. प्रशासनाने यंत्रणा युद्धपातळीवर तैनात करून परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे.

दरम्यान, खंडाळा तालुक्यातील अतिट गावात रात्रभर ढगफुटीसदृश पावसामुळे ओढे-नाल्यांना पूर आला. डोंगरातून मोठ्या वेगाने आलेले पाणी मंदिर परिसर आणि गावातील रस्त्यांवर पसरले. काही घरांमध्ये पाणी शिरल्याने घरगुती साहित्याचे नुकसान झाले असून शेतीचेही नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. ग्रामस्थांनी पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.

प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, दरडप्रवण आणि पूरग्रस्त भागांपासून दूर राहावे तसेच अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. हवामान विभागानेही पुढील काही तासांत पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा कायम ठेवला आहे.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *