पुणे: वेळप्रसंगी स्वतःला विकेन, पण पैशांसाठी 'छत्रपती' कारखाना बंद पडू देणार नाही; अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांची अत्यंत भावनिक साद

पुणे: जिल्ह्यातील बारामती येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या युनिट नंबर १ आणि युनिट नंबर २ चा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमादरम्यान कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी सभासदांशी संवाद साधताना अत्यंत भावनिक आणि आक्रमक भूमिका मांडली. चालू वर्षाचा गळीत हंगाम सुरू करताना राज्याचे नेते अजित पवार यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही, असे सांगत त्यांनी मागील हंगाम केवळ अजितदादा आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सहकार्यामुळेच यशस्वीपणे पार पडल्याचे स्पष्ट केले. सध्या कारखाना काही प्रमाणात आर्थिक अडचणीत असला, तरी मुख्यमंत्री, सुनेत्रावहिनी आणि दत्तामामा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी बोलताना पृथ्वीराज जाचक पुढे म्हणाले की, पैशाअभावी किंवा आर्थिक अडचणींमुळे सभासदांचा हा अत्यंत महत्त्वाचा 'छत्रपती' कारखाना कधीही बंद पडू दिला जाणार नाही. गरज भासल्यास प्रसंगी मी स्वतःला विकेन, पण माझ्या कारखान्याला बंद पडू देणार नाही, अशी भावनिक साद त्यांनी उपस्थितांना घातली. जिल्ह्यात सर्वात आधी आपल्या कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन होत असून, ऊस तोडणीसाठी ऍडव्हान्स देणारा हा पहिला कारखाना असल्याचा सार्थ अभिमान त्यांनी व्यक्त केला. यंदाच्या गळीत हंगामात तब्बल १२.५९ लाख टन ऊस गाळपाचे मोठे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सलग आठ वर्षे १२ लाखांहून अधिक टन गाळपाचे हे सत्र पूर्ण झाल्यास कारखाना पूर्णपणे कर्जातून आणि आर्थिक अडचणीतून बाहेर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सभासदांनी आपल्या शेतातील उसाचे टिपलू किंवा ऊस इतरत्र बाहेर जाऊ देऊ नये, आपल्या पूर्वजांनी उभे केलेले हे वैभव टिकवून ठेवणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे, असे आवाहन त्यांनी केले. "वजन चोख आणि रोख पैसे" हे आपल्या कारखान्याचे मुख्य वैशिष्ट्य असून, गाळपास येणारा ऊस आणि बाहेर जाणारी साखर एकाच वजनकाट्यावर मोजणारा हा एकमेव कारखाना आहे, असे त्यांनी सांगितले. लहानपणापासून वडिलांना कारखान्यात पाहिल्यामुळे पदाची किंवा पैशाची लालसा नसून सहकार संस्था टिकवणे आणि ती सुरळीत चालवणे हेच आपले मुख्य ध्येय असल्याचे जाचक यांनी शेवटी नमूद केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये कार्यकारी संचालक अशोक जाधव यांनी माहिती दिली तर सूत्रसंचालन युवराज रणवरे यांनी केले. या कार्यक्रमास उपाध्यक्ष शिवाजीराव निंबाळकर यांच्यासह अनेक संचालक, अधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी सभासद उपस्थित होते.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *