सातारा: पुणे-बंगळुरू महामार्गावर कवठे हद्दीत धाडसी दरोडा! कुरिअर व्हॅन अडवून चालक-क्लिनरला शस्त्राचा धाक; १ कोटी ११ लाखांचा ऐवज लुटला!

सातारा: पुणे-बंगळुरू महामार्गावरील कवठे (ता. वाई) गावच्या हद्दीत पुलाजवळ कुरिअर कंपनीचे वाहन अडवून दरोडेखोरांनी चालकाला शस्त्रांचा धाक दाखवत एक कोटी ११ लाखांचा ऐवज लंपास केला. दरोड्याचा थरारक प्रकार शुक्रवारी (दि. १६) सकाळी सातच्या सुमारास घडला. याप्रकरणी कुरिअर कंपनीच्या पिकअप जीपचे चालक विजय विलासराव पवार (वय ३६, रा. राजारामपुरी, कोल्हापूर) यांनी भुईंज पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अनोळखी सात दरोडेखोरांवर गुन्हा दाखल केला पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय पवार हे शुक्रवारी सकाळी पुण्याहून साताऱ्याच्य दिशेने महामार्गावरून प्रवास करीत होते. कवठे गावच्या हद्दीत महामार्गावरील तिसऱ्या लेनमध्ये कवठे पुलाच्या अलीकडे त्यांचे वाहन आले असता, दुचाकीवरून आलेल्या तीन अनोळखी व्यक्तींनी दुचाकी आडवी मारून पिकअप जीप थांबवली.


त्यानंतर दुचाकीवरील तिघांनी फिर्यादीला दमदाटी करून धक्काबुक्की केली. धारदार लोखंडी शस्त्रांचा धाव दाखवला. दरम्यान, आणखी दोन दुचाकींवरून चार अनोळखी व्यक्ती तिथे पोहोचल्या. तीन दुचाकींवरून आलेल्या एकूण सात जणांनी मिळून कुरिअर कंपनीच्या जीपमधील दागिन्यांचे पार्सल लंपास केले.
सोने-चांदीचा मोठा ऐवज लंपास

फिर्यादीच्या जीपमधील पांढऱ्या रंगाचे पोते घेऊन दरोडेखोरांनी पोबारा केला. त्या पोत्यात ६३५.५१ ग्रॅम वजनाचे सोने आणि १० किलो ३६६ ग्रॅम वजनाची चांदी होती. या ऐवजाची एकूण किंमत १ कोटी ११ लाख ८६ हजार ५ रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

परिसरात खळबळ
वर्दळीच्या महामार्गावर सकाळच्या वेळेत घडलेल्या दरोड्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरोडेखोरांनी नियोजनपूर्वक पाठलाग करून कुरिअर कंपनीचे वाहन अडवून ऐवज लुटला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेमागे आणखी कोणाचा सहभाग आहे काय, याचा तपास पोलिस करीत आहेत.


वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, सातारा विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी विपुल पाटील, वाई विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे, परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक पूनम झगडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके आणि भुईंज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या दृष्टीने पाहणी केली. या गुन्ह्याचा अधिक तपास परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक पूनम झगडे करीत आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *