पुणे: अशा घटना खपवून घेणार नाही; शिवाजीनगर कोर्टातील मंदार किवळे हल्ल्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले, पोलीस महासंचालकांना खडसावले!

पुणे: पुण्यातील शिवाजीनगर न्यायालय आवारात घडलेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र संताप व्यक्त करत स्पष्ट आणि कडक आदेश दिले आहेत. न्यायालयीन कामकाजासाठी आलेल्या मंदार किवळे याच्यावर ६ ते ७ हल्लेखोरांनी आधी गोळीबार केला आणि त्यानंतर कोयत्याने सपासप वार करत प्राणघातक हल्ला केला. या घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले होते; मात्र पुणे पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून कारवाईला वेग दिला आहे.

'अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत' - मुख्यमंत्री फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आणि मुंबईतील गोळीबाराच्या घटनांची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्याकडे दोन्ही घटनांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून, 'अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत' असा स्पष्ट इशारा आणि कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यात कोणतीही कुचराई होता कामा नये, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

गृहराज्यमंत्री योगेश कदम काय म्हणाले?

या घटनेबाबत बोलताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले की, पुण्यात झालेल्या घटनेतील गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून या घटनेतील संशयित आणि आरोपींना पकडण्याची कारवाई सुरू आहे. पोलीस या प्रकरणात आगामी तपास आणि कायदेशीर कारवाई करतील. घटना समोर आल्यानंतर ही सर्व मुले कुठून आली होती, त्यांच्यावर यापूर्वी कोणते गुन्हे दाखल होते का, याची सविस्तर माहिती मागवण्यात आली आहे. या प्रकरणाला सरकारने गांभीर्याने घेतले आहे. पुणे किंवा इतर कोणत्याही शहरात स्वतःची दहशत माजवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल, तर त्यांच्यावर दयामया न दाखवता कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत.

संशयित आरोपींना अटक आणि राजकीय प्रतिक्रिया

दरम्यान, शिवाजीनगर न्यायालय परिसरातील या हल्ल्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेवरून खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. या प्रकरणात तपासातून आणखी कोणती नवी माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या हल्ल्याप्रकरणी संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून, अक्षय चव्हाण, बाब्या पवार, यानप्या, रोहन कानगुडे, गणेश चव्हाण, अमोल रामचंद्र चव्हाण आणि गणेश सुभाष चव्हाण यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.



शहर

महाराष्ट्र

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *