अमरावती: इर्विन रुग्णालय परिसरात कापलेले दोन हात, एक पाय आणि डोके आढळल्याने खळबळ!

अमरावती: शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय म्हणजेच इर्विन रुग्णालय परिसरात मानवी शरीराचे वेगवेगळे अवयव आढळून आल्याने गुरुवारी (२६ नोव्हेंबर २०२६) मोठी खळबळ उडाली. रुग्णालयाच्या विविध भागांत कापलेले दोन हात, एक पाय आणि डोके आढळून आले आहे. धक्कादायक म्हणजे, या मानवी अवयवांचे मोकाट कुत्रे लचके तोडत असल्याचेही निदर्शनास आले. कुत्र्यांनी एक पाय वॉर्ड क्रमांक ९ समोर आणून टाकल्याने हा धक्कादायक प्रकार रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ९ समोर कुत्र्यांनी मानवी शरीराचा एक पाय आणून टाकला. यावेळी कुत्रे त्या मानवी अवयवाचे लचके तोडत असल्याचे दिसून आले. ही बाब लक्षात येताच रुग्णालय कर्मचाऱ्यांनी तातडीने परिसरात पाहणी केली असता मानवी शरीराचे आणखी अवयव वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आले. वॉर्ड क्रमांक ५१ आणि वॉर्ड क्रमांक १० यांच्या मधोमध असलेल्या नालीमध्ये शरीरापासून वेगळे झालेले एक हात आणि डोके आढळले. तसेच रुग्णालयाच्या इमारतीच्या मागील बाजूस आणखी एक हात मिळून आला. अशा प्रकारे एकाच रुग्णालय परिसरात दोन हात, एक पाय आणि डोके आढळून आल्याने रुग्णालयातील कर्मचारी, उपचार घेत असलेल्या रुग्णांचे नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीती व चिंतेचे वातावरण निर्माण झाले.

विशेष म्हणजे, आढळलेले हे मानवी अवयव नेमके कोणाचे आहेत, ते स्त्रीचे आहेत की पुरुषाचे, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. तसेच हे कापलेले अवयव रुग्णालय परिसरात कसे आणि कोठून आले, याबाबतही विविध प्रश्न आणि शंका उपस्थित होत आहेत. घटनेची माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संपूर्ण घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून अवयव ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. रुग्णालयासारख्या संवेदनशील आणि वर्दळीच्या ठिकाणी मानवी अवयव आढळून आल्याने या संपूर्ण घटनेचे गूढ उकलण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *