बलराज संघई यांचा कॉलम:श्री गणेश पूजनातील दुर्वांचे महत्त्व

श्री गणेशाचे पूजन करत असताना दुर्वा समर्पित करणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. 21 दुर्वांची जुडी श्री गणेशाला अर्पण केल्याशिवाय त्याची पूजा संपूर्णत्वाला प्राप्त होत नाही. तर या दुर्वा समर्पित का केल्या जातात?श्री गणेशाला दूर्वा का आवडतात? याबद्दलही काही महत्त्वाचे पौराणिक उल्लेख आढळतात. सर्वप्रथम दुर्वा म्हणजे काय? हे जाणणे ही आवश्यक आहे. ‘दुर्वा’या शब्दाचा अर्थ असा होतो की, “दु:खं व्रजति इति दुर्वा” – जे दुःख दूर करते ती दुर्वा. म्हणजेच ती तृण असूनही अनंत शक्तीची वाहक आहे. ती ज्या प्रकारे कितीही काढली तरी पुन्हा पुन्हा उगम पावते, तिच्या मुळ्या कधीही नष्ट होत नाहीत. सतत पुनरजीवीत होत राहतात.म्हणून ती अनंतचेतनेचं प्रतीक आहे. या दुर्वा पुनर्जन्म, पुनरुत्थान, व अजेयता दर्शवतात. श्री गणेशाला दुर्वा समर्पित करण्यामागे अनलासुराचा वध ही पौराणिक कथा आहे. ती या प्रमाणे: गणेश पुराणातील कथेनुसार, प्राचीन काळी अनलासुर नावाचा एक अत्यंत भयानक राक्षस होता. 'अनल' म्हणजे अग्नी. हा राक्षस आपल्या तोंडून निघणाऱ्या अग्नीने ऋषीमुनींना आणि देवांना जिवंत गिळून टाकत असे. त्याच्या त्रासाला कंटाळून सर्व देवांनी भगवान गणेशाचा धावा केला.भक्तांच्या रक्षणासाठी गणपतीने अनलासुराला जिवंत गिळले. अनलासुर हा अग्नीचा बनलेला असल्याने तो पोटात गेल्यावर गणपतीच्या पोटात प्रचंड आग आणि दाह, जळजळ होऊ लागली. श्री गणेशाचा दाह शांत करण्यासाठी देवांनी अनेक उपाय केले, वरुण देवाने शितल जलाचा वर्षाव केला. महादेवांनी आपल्या गळ्यातील साप गणपतीच्या पोटाला गुंडाळला.इंद्राने चंद्र त्याच्या मस्तकावर ठेवला. परंतु, या कोणत्याही उपायाने गणपतीची आग शांत झाली नाही. शेवटी, तेथे उपस्थित असलेल्या 88 हजार ऋषीमुनींनी प्रत्येकी 21 दुर्वांची जुडी गणपतीच्या मस्तकावर ठेवली. काही ठिकाणी श्री कश्यपुरुषांनी श्री गणेशाच्या मस्तकावर 21 दुर्वांची जुडी ठेवल्याचा उल्लेख आहे. दुर्वांचा स्पर्श होताच गणपतीच्या शरीराचा दाह पूर्णपणे शांत झाला. यामुळे प्रसन्न होऊन गणपती बाप्पाने घोषित केले की, "जी व्यक्ती मला दुर्वा अर्पण करेल, ती मला अत्यंत प्रिय असेल आणि तिच्यावर माझी सदैव कृपा राहील." तेव्हापासून गणपतीला 21 दुर्वा वाहण्याची परंपरा सुरू झाली. काही ठिकाणी दुर्वांचा रस करून श्री गणेशास प्राशन करण्यास दिला असाही उल्लेख आढळतो. श्री गणेशास दुर्वा अर्पण करण्यामागे अध्यात्मिक कारण ही आहे. आध्यात्मिक व धार्मिक मान्यतेनुसार, सर्व वनस्पतींमध्ये 'गणेशतत्त्व' आकर्षित करण्याची क्षमता दुर्वांमध्ये सर्वात जास्त असते. बाप्पाला दुर्वा वाहिल्याने मूर्तीमधील देवत्व अधिक जागृत होते, ज्याचा भक्तांना आध्यात्मिक लाभ मिळतो. आयुर्वेदानुसार आयुर्वेदात दुर्वाला अतिशय थंड आणि त्रिदोष नाशक (कफ, वात, पित्त शांत करणारी) औषधी वनस्पती मानले जाते. शरीरातील उष्णता किंवा जळजळ कमी करण्यासाठी दुर्वांचा रस अतिशय गुणकारी ठरतो. भाद्रपद महिन्यात (गणेशोत्सवात) निसर्गात उष्णता वाढलेली असते, त्यामुळे वातावरणातील आणि शरीरातील उष्णता संतुलित करण्याचे प्रतीक म्हणून दुर्वांचा वापर केला जातो. दुर्वा वाहताना नेहमी ३ किंवा ५ पात्यांची कोवळी दुर्वा निवडावी.गणपतीला नेहमी २१ किंवा ११ जोड्यांच्या (जुडी) स्वरूपात दुर्वा अर्पण कराव्यात.दुर्वा स्वच्छ धुवून आणि बाप्पाचे चरण, कपाळ किंवा कानाजवळ अर्पण कराव्यात. म्हणून श्री गणेशाची कृपा संपादन करण्यासाठी व गणराया सतत प्रसन्न ठेवण्यासाठी त्याचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्याला प्रिय असलेल्या दुर्वांची जुडी अर्पण करावी. या दुर्वा अर्पण करताना चा मंत्र खालील प्रमाणे आहे. दुर्वा अर्पण करण्याचा मंत्र ।। 'श्री गणेशाय नम: दुर्वांकुरन समर्पयामि'।। चतुर्थीच्यावेळी भगवान गणेशाला दुर्वा अर्पण करताना या मंत्राचा जप करावा. असे केल्याने विघ्नहर्ता प्रसन्न होतो आणि भक्ताच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) (संपर्क- 9420015108)

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *