एन. रघुरामन यांचा कॉलम:दीर्घ आयुष्याचे रहस्य कुणाकडून जाणून घ्यावे?

हे रहस्य बहुधा जगातल्या सर्वात वृद्ध जिवाकडून समजून घेता येईल. त्याचे वय सुमारे 194 वर्षे आहे! हे ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल, पण थांबा! आधी मी तुम्हाला 32 वर्षे मागे घेऊन जातो. दक्षिण आफ्रिकेचे तत्कालीन अध्यक्ष नेल्सन मंडेला यांची मुलाखत घेण्यासाठी मी तिथे शासकीय पाहुणा म्हणून गेलो होतो. तेव्हा 1994 मध्ये मला पहिल्यांदा या जिवाबद्दल समजले. त्या वेळी त्याचे वय 162 वर्षे होते. मला त्याच्याबद्दल कसे कळले? आम्ही काही पाहुणे केपटाउनमधील प्रसिद्ध ‘केप ऑफ गुड होप’ येथे उभे होतो. एका बाजूला अटलांटिक आणि दुसऱ्या बाजूला हिंदी महासागर, अशा दोन्ही महासागरांचा स्पर्श इथे अनुभवता येतो. तिथेच आम्हाला सेंट हेलेनाकडे जाणारे एक जहाज दिसले. सेंट हेलेना हा दक्षिण अटलांटिक महासागरातील दूरवरचा ज्वालामुखी बेट समूह आहे. आफ्रिकन खंडाच्या दक्षिण किनारपट्टीपासून तो सुमारे 1950 किलोमीटरवर आहे. याच बेटावर हा सर्वात वृद्ध जीव 1882 सालापासून राहतो. तेव्हा तेथे पोहोचण्यासाठी जहाज हा एकमेव मार्ग होता. आता जोहान्सबर्गहून शनिवारी एक साप्ताहिक विमानसेवा उपलब्ध आहे. मला त्याला भेटण्याची उत्सुकता होती, पण तेथे ब्रिटिशांचे कडक वसाहतवादी नागरिकत्व व व्हिसा नियम होते. त्यानुसार बिगर-कॉमनवेल्थ देश आणि भारतासारख्या काही देशांच्या नागरिकांना व्हिसाची गरज होती. माझ्याकडे तो नसल्याने भेटू शकलो नव्हतो. गेल्या आठवड्यात मी त्याच्या 194 व्या वर्षातील पदार्पणाची बातमी ऐकली. तेव्हा मला त्याची ही गोष्ट पुन्हा आठवली. त्याचे नाव ‘जोनाथन’ असून त्याचा जन्म 1832 मध्ये सेशेल्स येथे झाला होता. 1882 मध्ये सेंट हेलेनाचे 33 वे गव्हर्नर सर विल्यम ग्रे-विल्सन यांना भेट म्हणून त्याला या बेटावर आणले गेले. त्याने आजवर तब्बल 28 गव्हर्नर पाहिले आहेत. 2026 मध्ये त्याने वयाची 194 वर्षे पूर्ण केली आहेत. जोनाथन हा एक महाकाय कासव आहे! त्याचे वजन सुमारे 180 किलो आहे. तो आपल्यापेक्षा लहान डेव्हिड (56), एम्मा (56) व फ्रेडरिक (53) या तीन विशाल कासवांसोबत राहतो. मोतीबिंदूमुळे जोनाथन आता अंध झाला आहे आणि त्याची वास घेण्याची क्षमताही नाहीशी झाली. श्रवणशक्ती अजूनही उत्तम आहे. त्याला हाताने भरवणारे पशुवैद्य डॉ. जो हॉलिन्स यांच्या आवाजाला तो लगेच प्रतिसाद देतो. आपल्या प्रजातीच्या सरासरी वयापेक्षा तब्बल एक शतक जास्त जगलेल्या जोनाथनच्या या असामान्य आयुष्याने संशोधकांना आकर्षित केले. नुकतेच वैज्ञानिकांच्या एका आंतरराष्ट्रीय टीमने त्याच्या ‘डीएनए’चा अभ्यास केला. त्यासाठी त्याच्या गालातील पेशींचे नमुने घेण्यात आले. ‘सायन्स ॲडव्हान्सेस’मध्ये प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासातून त्याच्या जनुकीय रहस्याचा उलगडा झाला. जोनाथनमध्ये 287 अशी खास जनुकीय रूपे आहेत. ती वाढत्या वयासोबत पेशींमध्ये होणाऱ्या ऱ्हासाविरुद्ध सक्रियपणे लढा देतात. ट्यूमर रोखणे, खराब झालेल्या डीएनएची दुरुस्ती करणे आणि इन्सुलिनची पातळी नियंत्रित ठेवणे, यासाठी आवश्यक मजबूत जनुके त्याच्या शरीररचनेत आढळली आहेत. मानवामध्ये वयानुसार पेशींच्या पुनरुत्पादनात गंभीर त्रुटी निर्माण होतात, परंतु जोनाथनच्या पेशींमध्ये मात्र अगदी तरुण जिवाप्रमाणेच जनुकीय नियंत्रण टिकून राहते. याच कारणामुळे जास्त वयातही त्याचे शरीर कमालीचे तंदुरुस्त आहे. जोनाथनला तरुण ठेवणाऱ्या या जैविक प्रक्रियेचा वापर मानवातील आजार, मायटोकॉन्ड्रियल उपचार आणि वाढत्या वयाचा प्रभाव रोखणाऱ्या उपचारांसाठी करता येईल का, हे समजून घेण्यासाठी वैज्ञानिक सध्या त्याच्या जनुकीय आराखड्याचे विश्लेषण करत आहेत. वाढते वय हा मानवातील जुनाट आजारासाठीचा सर्वात मोठा धोका असतो. निसर्गाने वाढत्या वयाची ही गुंतागुंत आधीच अत्यंत प्रभावीपणे सोडवली आहे आणि जोनाथनचा जीनोम पेशींच्या या प्रतिकारक्षमतेचा उत्तम आराखडा सादर करतो. वयासोबत डीएनए क्षीण होत जातो. तो दुरुस्त करण्यासाठी शरीरात नैसर्गिक यंत्रणा असते खरी, पण वेळेनुसार ती कमकुवत होत जाते. याउलट जोनाथनने आपल्या जनुकीय संकेतांचे महत्त्वाचे भाग टिकवून ठेवण्यात उत्तम जुळवून घेतले आहे. संशोधकांना त्याच्या डीएनएमध्ये खराब झालेल्या पेशींची दुरुस्ती करणारी विशेष जनुके सापडली आहेत. फंडा असा की- जोनाथनचे आयुष्य व त्याचा आहार समजून घेईपर्यंत आपण मानवांनीही दीर्घ आयुष्य जगणाऱ्या आपल्या पूर्वजांच्या जीवनशैलीतील चांगल्या गोष्टी शिकायला हव्या. त्या आत्मसात केल्यास आपले आयुष्यही नक्कीच थोडे अधिक वाढू शकेल.

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *