भंडारा: खाकी वर्दीतील ४७ हजार होमगार्ड जवानांचे भवितव्य अंधारात; सेवेत कायम होण्याचे स्वप्न अपूर्णच, शासन दरबारी प्रतीक्षा कायम

भंडारा: महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ आणि पोलीस दलाच्या खांद्याला खांदा लावून अहोरात्र सेवा बजावणाऱ्या राज्यभरातील तब्बल ४७ हजारांहून अधिक होमगार्ड जवानांचे शासकीय सेवेत कायम होण्याचे स्वप्न अद्यापही अपूर्णच राहिले आहे. वर्षानुवर्षे अत्यंत अल्प मानधनावर आणि कुठल्याही प्रकारच्या कायमस्वरूपी नोकरीच्या सुरक्षेशिवाय सेवा बजावणाऱ्या या होमगार्ड जवानांच्या वाट्याला केवळ निराशाच आली आहे. शासनाकडून वारंवार आश्वासने मिळूनही प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्यामुळे होमगार्ड जवानांमध्ये आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये तीव्र संताप व नैराश्याचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखणे, वाहतूक नियंत्रण करणे, सण-उत्सव, मोर्चे, निवडणुक व आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांच्या मदतीसाठी होमगार्ड जवान अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, एवढे सगळे कष्ट उपसूनही या जवानांना शासकीय नियमानुसार कायमस्वरूपी कर्मचाऱ्याचा दर्जा किंवा योग्य त्या सुविधा मिळत नाहीत. पोलिसांच्या बरोबरीने किंवा त्यांच्यापेक्षाही अधिक तास काम करूनही यांना मिळणारे मानधन अतिशय तुटपुंजे आहे, ज्यामध्ये आजच्या या महागाईच्या काळात कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे अत्यंत कठीण झाले आहे.

राज्यात आणि विशेषतः भंडारासह विविध जिल्ह्यांमध्ये होमगार्ड म्हणून काम करणाऱ्या तरुणांनी आणि ज्येष्ठांनी अनेकदा आपल्या मागण्या शासनासमोर मांडल्या आहेत. पोलीस भरतीमध्ये किंवा इतर शासकीय विभागांमध्ये होमगार्ड्सना हक्काची आणि कायमस्वरूपी सामावून घेण्याची त्यांची जुनीच मागणी आहे. मात्र, प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर किंवा आंदोलनांच्या वेळी राजकारण्यांकडून केवळ पोकळ आश्वासने दिली जातात, प्रत्यक्षात मात्र फाईल पुढे सरकत नाही. शासकीय सेवेत सामावून घेण्याचे त्यांचे स्वप्न वर्षानुवर्षे कागदावरच रेंगाळले असून, हलाकीच्या परिस्थितीत दिवस काढणाऱ्या या ४७ हजार जवानांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *