Nashik : अशोक खरात प्रकरणात ED ॲक्शन मोडमध्ये; पुण्यात 3 ठिकाणी छापे, नाशिकमध्ये खरात यांच्या घराची 12 तासांपासून झाडाझडती सुरू.

Pune : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय (ED) ॲक्शन मोडमध्ये आले असून सोमवारी पहाटेपासून नाशिक आणि पुण्यात मोठी कारवाई सुरू आहे.

नाशिकमधील कर्मयोगी नगर येथील ‘तृप्तबाला’ बंगल्यावर ईडीने छापा टाकला असून तब्बल 12 तासांहून अधिक काळ झाडाझडती सुरू आहे. इनकम टॅक्स आणि ईडीच्या अधिकाऱ्यांकडून संयुक्त कारवाई होत असून 5 पुरुष आणि 2 महिला अधिकारी अशा 7 जणांचे पथक कागदपत्रांची सखोल तपासणी करत आहे. अशोक खरात यांच्या बेनामी मालमत्ता आणि आर्थिक गैरव्यवहारांचा तपास या वेळी केंद्रस्थानी आहे.

दरम्यान, पुण्यातही एकाच वेळी तीन ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. खरातशी संबंधित ट्रस्टमध्ये पाच वर्षे ट्रस्टी राहिलेले सीए ललित पोफळे यांच्या घरावर ईडीने धाड टाकली आहे. सकाळी सात वाजल्यापासून सुरू असलेल्या या कारवाईत आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. पोफळे आणि खरात यांच्यातील आर्थिक संबंध, तसेच अल्पावधीत वाढलेली संपत्ती याबाबत आधीच संशय व्यक्त केला गेला होता.

दुसरीकडे, शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर यांची सुमारे 8 तास चौकशी करण्यात आली. समता पतसंस्थेतील खात्यांबाबत ही चौकशी झाली असून त्यांच्या आणि मुलाच्या नावावर असलेल्या खात्यांवरून कोट्यवधींचे व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे. या खात्यांशी अशोक खरात यांचा संबंध असल्याचा तपासात दावा करण्यात आला आहे.

याच पार्श्वभूमीवर ईडीने शिर्डीतील समता पतसंस्थेच्या राहाता शाखेतही धाड टाकली. या संस्थेत अशोक खरात नॉमिनी असलेली सुमारे 100 खाती असून त्यावरून 60 कोटींहून अधिक व्यवहार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

एकीकडे पोलिसांचा तपास सुरू असताना दुसरीकडे ईडीनेही तपासाची सूत्रे हाती घेतली असून खरात यांच्या मालमत्ता, पतसंस्था आणि आर्थिक व्यवहारांचे जाळे उलगडण्यावर भर दिला जात आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *