Pune : पुण्यात ११ तासांपासून मुसळधार पाऊस, नागरिकांचे हाल; सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Pune : पुण्यातील काही भागांत ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने अनेक सखल भागांत पाणी साचले असून याचा वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. रविवारी रात्री १० वाजल्यापासून पाऊस सुरु असून दुसऱ्या दिवशी सकाळी सोमवारही जोरदार कोसळत आहे. दरम्यान यामुळे लोणी-काळभोर, हडपसर परिसरातील बहुतेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे पुणे सोलापूर महामार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक कोंडी झाली. तर शहरातील अनेक भागांतही वाहतूक कोंडी झाली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पुणेकरांना मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे.

उरुळी कांचन परिसरात रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे, नायगाव फाटा येथील पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर आले होते. रात्री ०१.३० वाजल्यापासून रस्त्यावरुन पाणी वाहत असल्यामुळे, पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग बंद होता. त्यामुळे नायगाव ते यवतपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. तर पुण्यातील आळंदी, वाघोली केसनंद फाटा येथेही रस्त्यांवर पाणी आल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.

मुसळधार पावसामुळे महामार्गावर बऱ्याच गाड्या बंद पडल्या आहेत. पोलिस अधिकारी व कर्मचारी वाहतूक सुरळीत करण्याचे काम करीत आहेत, पाऊस सुरु असल्याने वाहतूक सुरळीत करण्यात अडचणी येत आहे. वाहतूक सुरळीत होण्यास वेळ लागेल अशी माहिती उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी सांगितले आहे.

दरम्यान खडकवासला धरण साखळी क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु असल्याने खडकवासला धरणातून सकाळी१० वाजता १४ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे तर रात्री १२ पासून महापालिका प्रशासनाच्या टीम विविध शहरात ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत . पाऊस वाढण्याची शक्यता कमी, त्यामुळे सध्या तरी धोकादायक स्थिती नसली तरी खबरदारी घेण्यात आली आहे. महापालिका प्रशासन पाटबंधारे विभागाच्या सतत संपर्कात आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *