सोलापूर: केळीला अवघा दोन रुपये दर आणि निर्यातीचे संकट; सोलापूरमध्ये संतप्त शेतकऱ्याने चार एकरांतील उभ्या बागेवर फिरवला रोटाव्हेटर!

सोलापूर: दुष्काळ, भूजल पातळीतील मोठी घट आणि वाढता उत्पादन खर्च या प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत उभी केलेली केळीची बाग बाजारभावाअभावी मातीत गाडण्याची वेळ सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. मोहोळ तालुक्यातील पापरी येथील शेतकरी मोहन ढेकळे यांनी उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने आपल्या चार एकरांतील खोडवा केळीच्या उभ्या बागेवर रोटाव्हेटर फिरवून घड जमिनीत मिसळले. तर दुसरीकडे, करमाळा तालुक्यातही आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यातीत अडथळे निर्माण झाले असून, तेथील केळी लागवड क्षेत्रात यंदा मोठी घट झाली आहे.

लाखो रुपयांचा खर्च, पदरी अवघा दोन ते पाच रुपये दर

पापरी येथील शेतकरी मोहन ढेकळे यांनी चार एकर क्षेत्रातील केळीच्या पहिल्या पिकानंतर खोडव्याचे पीक घेतले होते. यंदा पावसाअभावी भूजल पातळी खालावली असतानाही उपलब्ध पाण्याचे नियोजन करून त्यांनी बाग कशीतरी जगवली होती. घडांना आधार देण्यासाठी १० हजार रुपये खर्चून प्लॅस्टिक पट्ट्या बांधल्या होत्या, तर काढणीपूर्वी ८० हजार रुपयांची अतिरिक्त खते दिली होती. या खोडवा पिकासाठी एकूण २ लाख रुपयांचा खर्च झाला होता.

बागेतील घड काढणीस तयार झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी इराण-इराक युद्ध आणि निर्यातबंदीचे कारण सांगत २५ किलोच्या कॅरेटला अवघे ५० ते ६० रुपये, म्हणजेच प्रतिकिलो केवळ दोन ते पाच रुपये इतकाच तुटपुंजा दर देऊ केला. शिवाय, केळी बागेतून काढून बाहेर आणून देण्याची अट व्यापाऱ्यांनी घातली. घड उतरवणे आणि वाहतुकीचा खर्च पाहता हा दर पूर्णपणे तोट्याचा ठरत असल्याने त्यांनी माल बाजारात नेण्याऐवजी स्वतःच्या उभ्या बागेवर रोटाव्हेटर फिरवणे पसंत केले. या संपूर्ण प्रक्रियेतून त्यांची केवळ १७ हजार रुपयांची केळी विकली गेली, तर चार एकरांतील बाग जमिनीत गाडण्यासाठी त्यांना स्वतःला आणखी ५० हजार रुपये खर्च करावा लागला. या खोडवा पिकातून सुमारे १० लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते, मात्र शेवटी पदरी निराशा पडली.

करमाळा तालुक्यात केळी लागवड क्षेत्रात मोठी घट

उजनी धरण लगतच्या करमाळा तालुक्यातही केळी उत्पादकांची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. उजनी जलाशयाचा पट्टा असतानाही पावसाच्या अनिश्चिततेमुळे आणि भूजल पातळी खालावल्याने करमाळा तालुक्यातील शेतकरी नवीन लागवडीबाबत अतिशय सावध भूमिका घेत आहेत. करमाळा तालुक्यात २०२३-२४ मध्ये १६,८२० हेक्टर, २०२४-२५ मध्ये २०,३५३ हेक्टर आणि २०२५-२६ मध्ये २०,७९० हेक्टरवर केळीची लागवड झाली होती. मात्र, चालू वर्षात हे क्षेत्र घसरून थेट ५,१११ हेक्टरवर आले आहे.

पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे कंटेनर भाडे ६ हजार डॉलर्सवर पोहोचले आहे. माल पोहोचण्यास पूर्वी १० दिवस लागायचे, तिथे आता तब्बल ४० दिवस लागत आहेत. परिणामी, केळीची निर्यात पूर्णपणे कोलमडली असून स्थानिक बाजारात केळीचे भाव धडाडत खाली आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील ही स्थिती जोपर्यंत सुधारत नाही, तोपर्यंत दर वाढण्याची शक्यता दिसत नाही, ज्यामुळे केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटाच्या खाईत लोटले गेले आहेत.



महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *