Pune : पुण्यातील 12 ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पांना गती; बाणेर–पाषाण लिंक रोड अंतिम टप्प्यात, 30 वर्षांचा रखडलेला प्रश्न मार्गी

Pune : पुण्यातील बाणेर, बालेवाडी आणि पाषाण परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाचा मानला जाणारा बाणेर–पाषाण लिंक रोड लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. तब्बल तीन दशकांपासून रखडलेला हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी महापालिकेने हालचाली वेगवान केल्या आहेत.

सुमारे 1.2 किलोमीटर लांबीच्या या रस्त्याचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. मात्र, भूसंपादनाच्या अडचणींमुळे केवळ 200 मीटरचा महत्त्वाचा भाग अद्याप रखडलेला आहे. हा भाग पूर्ण करण्यासाठी महापालिकेकडून कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

हा रस्ता 1992 मध्ये मंजूर झाला असला तरी प्रत्यक्ष कामाला 2014 मध्ये सुरुवात झाली. भूसंपादनातील गुंतागुंतीमुळे प्रकल्पाला वारंवार विलंब झाला. दरम्यान, या रस्त्याचा समावेश महापालिकेच्या ‘मिसिंग लिंक’ योजनेत करण्यात आला असून शहरातील 33 पैकी 12 रस्ते चालू वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.

2021 मध्ये ‘बाणेर-पाषाण लिंक रोड वेल्फेअर ट्रस्ट’ने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने महापालिकेला कालबद्ध कार्यक्रम सादर करण्याचे आदेश दिले. तरीही विलंब होत राहिल्याने एप्रिल 2025 मध्ये न्यायालयाने कठोर भूमिका घेत दोन महिन्यांत भूसंपादन आणि चार महिन्यांत रस्ता पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

भूसंपादनासाठी महापालिकेने जिल्हा प्रशासनाकडे 25 कोटी रुपयांचा निधी जमा केला असून जमीन ताब्यात मिळाल्यानंतर उर्वरित काम तातडीने सुरू करण्याची तयारी करण्यात आली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बाणेर, बालेवाडी आणि पाषाण परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.

 


शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *