पुस्तक परीक्षण:‘जागर विश्वजननीचा’मधून जागतिक स्तरावरील ‘स्त्री’ संस्कृतीचा अभ्यासपूर्ण धांडोळा

कोणत्याही संस्कृतीचे पालन, जतन आणि वहन ‘स्त्री’कडून जितके होते, तितके पुरूषाकडून क्वचितच होते. भारतासह जगभरातील अनेक संस्कृतींमधून ‘स्त्री’ला विविध देवता रूपांतून पूजले जाते. जननी, जन्मभूमी आणि जगदजननी म्हणजेच व्यष्टी, समष्टी आणि परमेष्टी अशा टप्प्यांमधल्या जगभरातील स्त्री देवी, तिची वेगवेगळी रूपे, त्या अनुषंगाने येणाऱ्या कथा आणि परंपरा यांबद्दल वाचकांमध्ये जागरूकता निर्माण करणारे पुस्तक असे ‘जागर विश्वजननीचा’ या पुस्तकाचे स्वरूप आहे. प्रथमदर्शनी हे पुस्तक एखादा आध्यात्मिक, पौराणिक ग्रंथ असल्याचा भास होतो. पण तेवढ्यापुरतेच त्याचे महत्त्व मर्यादित नाही. ग्रीस, इटली, बॅबिलोन, आफ्रिकेतील देश, तिबेट, चीन, जपान, कोरियासह भारतातील विविध प्रदेशातल्या देवीरूपांचा सखोल आणि तौलनिक अभ्यास वाचकांपुढे मांडणारे हे पुस्तक आहे. म्हणूनच श्रद्धाळूंसाठी धार्मिक ग्रंथ आणि अभ्यासकांसाठी माहितीपूर्ण, मार्गदर्शक संदर्भग्रंथ असे ‘जो जे वांछील तो ते लाहो’ अशा पठडीतील हे पुस्तक आहे. सुरुवातीच्या प्रकरणांतून भारतातील शैव, वैष्णव, शाक्त, गाणपत्य, सौर आदी पंथ, उपपंथांतील उपासनापद्धती, चालीरीती, राजकीय आक्रमणे, सामाजिक रचना व भौगोलिक परिस्थितीनुसार, कालपरत्वे त्यात होत गेलेले बदल यांची माहिती मिळते. एखाद्या गोष्टीत अनेक स्थित्यंतरे कशी होतात आणि विशिष्ट गोष्टीच्या मूळ रूपापेक्षा सद्य रूप तिला कसे मिळते, हे समजून घेण्यासाठी असे अभ्यासपूर्ण विवेचन उपयुक्त ठरते. राखेतून जिवंत होणारा ‘अमर’ पक्षी, देवी अदितीचे वाहन आहे, हे वाचताना फिनिक्स पक्ष्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. मुळात ही गोष्ट आपल्याकडेही आहे, पण पहिल्यांदा वाचताना आठवतो तो ‘फिनिक्स’ पक्षी! यासाठीच ‘जागर’ महत्त्वाचा. तरीही ‘हे आधीच आमच्याकडे होते, बाकीच्यांनी आमच्याकडूनच हे उचलले आहे’ अशा प्रचारकी थाटाला हे पुस्तक पूर्णपणे फाटा देते. स्वतःच्या संस्कृतीची स्वत:शी नव्याने ओळख करून देताना ते जागतिक स्तरावरील ‘स्त्री’ संस्कृतीचा अभ्यासपूर्ण धांडोळा घेते. मातृपूजन परंपरेचा इतिहास, वेद आणि उपनिषदांतील मातृशक्ती (उपनिषदे वेदांच्या शेवटी येत असल्याने उपनिषदांनाच ‘वेदांत’ म्हणतात), पुराणातील आदिशक्ती, ‘सप्तशती’तील नवदुर्गा, आरण्यकातील आदिमाता,(अरण्यात रचना झाली - ती आरण्यके), महाभारतातील देवी, भारतातील शक्तिउपासना आणि शाक्त या प्रकरणांतून भारतीय देवींच्या विविध अभिव्यक्ती वाचकांपुढे येतात. ती अधिक स्पष्ट करून सांगण्यासाठी सढळपणे संस्कृत श्लोकांची मराठी अन्वयार्थासह उद्धरणे वापरली आहेत. त्यातून अदिती, परांबिका, त्रिपुरसुंदरी, कन्याकुमारी, गायत्री, पद्मावती (आलुवेलूमंगम्मा), अन्नपूर्णा अशा अनेक देवींची महती कळते. भगवद्गीतेप्रमाणे ‘देवीगीता’ही आहे; त्यात नऊ अध्याय आणि चारशे श्लोक आहेत, यांसारखे ज्ञान पुस्तकातील पानापानंवर विखुरले आहे. ‘राष्ट्र’ हा शब्द कदाचित पहिल्यांदा देवीसूक्तात वापरला गेला असावा, त्याचा संदर्भ असणारा श्लोक या पुस्तकात आहे. दक्षिणमार्गी आणि वाममार्गी यांत नेमके अंतर, श्रौत व स्मार्त तंत्रातील फरक, विविध पंथांच्या तंत्रपद्धती, देवीची वाहने, श्रीयंत्र इत्यादींवरील संशोधनपर विवेचन वाचकाच्या ज्ञानकक्षा रूंदावते. सप्तमातृका, अष्टमातृका, चौसष्ठ योगिनी यांच्या सचित्र माहितीमुळे रोचकता वाढते. शाक्तपंथातील ‘मद्य, मांस, मत्स्य, मुद्रा, मैथुन’ हे पाच ‘म’कार, तसेच ‘बलि’दानाची मीमांसा, त्यासंबंधीचे गैरसमज दूर करण्यास उपयुक्त ठरते. अर्धनारीनटेश्वर आणि नटराजाविषयीचे सविस्तर निरूपणही मनोवेधक आहे. बॅबिलॉनियन संस्कृतीतील अत्यंत लोकप्रिय मातृदेवता ‘ईश्तर’. तिचे सीरियातील नाव ‘अस्टार्टे’, मोआनमधील ‘आश्तर’, अरबस्तानातील ‘आख्तर’ , ॲबिसिनियातील ‘आस्तर’ असा युरेशिया आणि आफ्रिका खंडातील पट लेखिका उलगडतात. दुसऱ्या उदाहरणात, जी भारतातील रती, ती इजिप्तमधील मिलित्ता, ग्रीसमध्ये ॲफ्रोडाइटी, रोममध्ये व्हीनस असते. आजच्या काळात ‘आयसिस’ हे देवीचे नाव आहे, हे वाचून थोडे आश्चर्य वाटेल, पण ते खरे आहे! ‘अनाहिता’ हे अगदी भारतीय वळणाचे नाव वाटत असले, तरी ती इराणी मातृदेवता आहे आणि या शब्दाचा अर्थ ‘निष्कलंक’ असा आहे, हा नाविन्यपूर्ण शोध या पुस्तकातूनच लागला. कालीमातेशी बरेचसे मिळतेजुळते दर्शन असणारी ॲझटेक देवी ‘कोएत्लिक्यू’ कुतूहल वाढवणारी आहे. कुनलून पर्वतावर निवास असल्यानेच चिनी आद्य देवीचे नाव ‘कुन’ आहे. ख्रिस्ती धर्मातील सेंट मेरी आणि मॅग्डालिन या संतपदी पोहोचलेल्या, परंतु देवीसमान उत्कट भक्तिभावाने आराधल्या गेलेल्या विभूतींची वर्णनेही अतिशय वाचनीय आहेत. इस्लामच्या उदयापूर्वी अरबस्तानात अनेकेश्वरवादी लोक राहत असत. अल् उज्झा, अल् लत आणि मन्नत या अरबस्तानातील स्त्री देवतांवर एक स्वतंत्र प्रकरण आहे. अशा प्रकारे ‘जागर विश्वजननीचा’तून देवीच्या ‘विश्वरूप दर्शनाचा’ योग घडतो. हे घडताना भारतासह जगभरातील विविध ठिकाणची रंगीत व कृष्णधवल छायाचित्रे, प्रतिमा, मूर्तींचे फोटो दिले असल्याने पुस्तकात जिवंतपणा आला आहे. त्यामुळे लिखित वर्णनाची समज वाढण्यास भरीव मदत होते. आई या शब्दाला बॅबिलोनियन भाषेत उम्मा, ॲकॅडियन भाषेत उम्मी व द्राविडी भाषांत अम्मा हा शब्द आहे. ‘उमा’ या मातृदेवतेची त्याच्याशी घातलेली सांगड विचार करायला भाग पाडते. तसेच काली, कराली, कात्यायनी, काममालिनी, दुर्गा, महानारायणी, कन्याकुमारी, महाशालिनी, सुभगा, गौरी अशा एका देवीच्या नामांतरांचे वर्णन करणाऱ्या श्लोकांचे रसग्रहण अप्रतिम आहे. यादृष्टीने विचार केल्यास शिल्पकला, मानववंशशास्त्र, भाषांच्या अभ्यासकांसाठीही हे पुस्तक उपयोगी ठरते. ‘जागर विश्वजननीचा’ पितृसत्ताक समाजात झालेली स्त्रियांची अवहेलना, स्त्रीमुक्तीचा विचार, या चळवळीतील विविध प्रवाह व मातृशक्तिपूजनाच्या आधुनिक कल्पनांना बगल न देता पुढे जाते, हे विशेष. पुस्तकाच्या संपादनावर आनंद हर्डीकर यांनी विशेष मेहनत घेतल्याचे जाणवते. या विषयावरचे अभ्यासपूर्ण पुस्तक वाचकांच्या हाती सुपूर्द करताना लेखिकेच्या लेखणीतून एकाच वेळी अभिमान आणि विनम्रता यांचे अनोखे मिश्रण पाझरते. बराचसा संशोधनपर आणि काहीसा मुक्तचिंतनपर असणारा हा ग्रंथ ‘आतां अभिनव वाग्विलासिनी। जे चातुर्यार्थ कलाकामिनी। ते श्रीशारदा विश्वमोहिनी। नमिली मियाँ’ या भावनेने त्यांनी सादर, सविनय विश्वजननीला अर्पण केला आहे. त्या विश्वजननीची छत्रछाया त्यांच्या लेखणीवाटे वाचकांना कायम लाभत राहो, ही प्रार्थना. पुस्तकाचे नाव - जागर विश्वजननीचा लेखिका - डॅा. कल्याणी हर्डीकर प्रकाशक - विश्वकर्मा पब्लिकेशन्स मूल्य - ₹ 395 पृष्ठसंख्या - 256 (लेखक प्रसिद्ध पचनसंस्था विकारतज्ज्ञ असून ते कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेच्या (करामसाप) बेंगलोर विभागाचे उपाध्यक्ष आहेत.)

This post was originally published on this site.



महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *