बीड: लेकींच्या शिक्षणासाठी आईचा अनवाणी एल्गार; साडी नेसून धावली अन् अंबाजोगाईत जिंकली मॅरेथॉन!

बीड: ना महागडे स्पोर्टस शूज, ना ट्रॅकसूट, ना कसला प्रशिक्षक.. हातात होती ती फक्त रोजच्या कष्टाची ताकद आणि मनात दोन मुलींच्या भविष्याची चिंता। याच जिद्दीच्या जोरावर अंबाजोगाईत आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत स्वयंपाकाचे काम करणाऱ्या रमाबाई रणवीर (वय ४७) यांनी चक्क साडी नेसून, स्लीपर हातात धरून अनवाणी पायाने धावत प्रथम क्रमांक पटकावत ३ हजार रुपयांचे बक्षीस पटकावले.

तरुर्णीना मागे टाकत त्यांनी मिळवलेल्या या सुवर्णविजयाने उपस्थितांचे डोळे पाणावले, तर संपूर्ण परिसर टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेला. भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्वर शैक्षणिक संकुलाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शनिवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भगवानबाबा चौक दरम्यान 'अमृत दौड' मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

 

 

याच गर्दीत सर्वात मागच्या रांगेत रोजच्या सारख्या साध्या साडीत रमाबाई उभ्या होत्या. लोकांना वाटले त्या केवळ गंमत म्हणून आल्या असाव्यात. मात्र ध्वज फडकला, शिट्टी वाजली आणि त्या धावू लागल्या.
पोरांच्या संसारासाठी रोज धावपळ करते, आज स्वतःसाठी धावले..
सुरुवातीला तरुण-तरुणी वेगाने पुढे निघून गेले. काही अंतर पार केल्यानंतर पायातील स्लीपर निसटू लागल्याने रमाबाईंनी ती हातात घेतली आणि अनवाणी पायाने धावायला सुरुवात केली.

पावसाने गार पडलेला रस्ता आणि पायाला टोचणारे खडे अशा प्रतिकूल परिस्थितीत साडीचा पदर सांभाळत त्या धावत होत्या. एक-एक करत ट्रॅकसूट घातलेल्या स्पर्धकांना मागे टाकले आणि फिनिशिंग लाइनवर प्रथम धडक मारली.
आयोजकांनी जेव्हा त्यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस दिले, तेव्हा "पोरांच्या संसारासाठी रोज धावपळ करते, आज स्वतःसाठी धावले" असं म्हणाल्या.


मुलींच्या शिक्षणासाठी सोडली हिंगोली
पतीच्या निधनानंतर पदरात असलेल्या दोन्ही मुलींना शिकवून मोठे करण्याची संपूर्ण जबाबदारी रमाबाईवर आली आहे.
मुलींच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न समोर असल्याने त्या मूळ गाव हिंगोली सोडून अंबाजोगाईत वास्तव्यास आल्या. येथे त्या लोकांकडे स्वयंपाकाचे काम करतात.

 



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *