Mumbai : मुंबईत साकारतोय देशातील सर्वात लांब शहरी बोगदा; ठाणे-बोरिवली दरम्यान ११ किमीचा वेगवान मार्ग, प्रवासात मोठी वेळ बचत

Mumbai : ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पामुळे मुंबई महानगर प्रदेशातील वाहतुकीत मोठा बदल घडणार आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटी सुधारत ठाणे आणि बोरिवलीमधील अंतर लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. 11.84 किमी लांबीच्या या मार्गामुळे सध्या 60 ते 90 मिनिटांचा प्रवास अवघ्या 15 मिनिटांवर येण्याची शक्यता आहे.

2028 पर्यंत पूर्ण होणार प्रकल्प
हा दुहेरी बोगदा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणार असून वनक्षेत्राला कमीत कमी हानी पोहोचेल याची काळजी घेतली जाणार आहे. यासाठी अत्याधुनिक टनेल बोरिंग मशीनचा वापर करण्यात येणार आहे. सध्या 23 किमीचा असलेला मार्ग या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. 2028 पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

वाहतूक कोंडीवर उपाय
सध्या ठाणे ते बोरिवली प्रवासासाठी घोडबंदर मार्गाचा वापर करावा लागतो. मात्र, या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवाशांचा वेळ वाया जातो. नव्या बोगद्यामुळे या समस्येवर मोठा दिलासा मिळणार आहे. गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पाशीही हा मार्ग जोडला जाणार असून, त्यामुळे एकूण कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम होईल.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
‘नायक’ आणि ‘अर्जुन’ नावाच्या प्रगत टनेल बोरिंग मशीनच्या मदतीने खोदकाम करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ‘नायक’ हे देशातील एकमेव सिंगल शिल्ड हार्ड रॉक टीबीएम आहे. या तंत्रज्ञानामुळे बोगद्यांचे काम अधिक सुरक्षित आणि जलद गतीने पूर्ण होणार आहे.

सुरक्षा आणि सुविधा
प्रत्येक बोगद्यात तीन लेन असतील, त्यात एक आपत्कालीन लेनचा समावेश असेल. दर 300 मीटरवर क्रॉस पॅसेज तयार करण्यात येणार असून अग्निशमन यंत्रणा, स्मोक डिटेक्टर आणि एलईडी माहिती फलक बसवले जाणार आहेत. याशिवाय, घोडबंदर रोड ते वेस्टर्न एक्सप्रेस महामार्ग जोडणारे कनेक्टरही उभारले जाणार आहेत.

या प्रकल्पामुळे मुंबई आणि ठाणे परिसरातील प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सोयीस्कर होणार असल्याचे चित्र आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *