Solapur : वडिलांनी पिकांना पाणी देण्यास सांगितल्याने वाद; रागाच्या भरात नववीतील मुलाने शेतात जाऊन आयुष्य संपवलं

Solapur : सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे कासेगाव येथे एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. गावातील यात्रेच्या दिवशी शेतात पाणी देण्यास सांगितल्यामुळे रागाच्या भरात १६ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हरिदास अशोक मोरे असे मृत मुलाचे नाव असून, ही घटना रविवारी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आली. हरिदास हा इयत्ता नववीत शिकत होता आणि गावातील तालमीत कुस्तीचे प्रशिक्षण घेत होता. त्याला भविष्यात एक यशस्वी पैलवान बनण्याची महत्त्वाकांक्षा होती.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी गावात यात्रा असल्यामुळे हरिदासला त्यात सहभागी व्हायचे होते. मात्र, उन्हाळ्यामुळे पिकांना पाणी देणे आवश्यक असल्याने वडिलांनी त्याला आधी शेतात जाऊन पाणी देण्यास सांगितले. यावरून हरिदास नाराज झाला होता. अखेर वडिलांच्या सांगण्यावरून तो मित्राच्या गाडीवरून शेतात गेला.

दरम्यान, त्याचा राग लक्षात आल्याने कुटुंबीयांना संशय आला. त्यामुळे त्याच्या भावाला काही वेळाने शेतात पाठविण्यात आले. मात्र, तोपर्यंत हरिदासने शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले.

भावाने तत्काळ दोरी कापून त्याला खाली उतरवले आणि वडिलांना बोलावून त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणाची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत करण्यात आली आहे.

हरिदास हा कुस्तीमध्ये प्रावीण्य मिळवत होता. जिल्हा पातळीवरील स्पर्धांमध्ये त्याने ६२ किलो वजनी गटात पदके मिळवली होती आणि राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्याची निवडही झाली होती. मात्र, किरकोळ कारणावरून त्याने घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे.

त्याच्या पश्चात आई-वडील, एक लहान भाऊ आणि एक मोठा भाऊ असा परिवार आहे. शासकीय रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळाला.

 
 


शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *