एन. रघुरामन यांचा कॉलम:न्यायालय आणि स्वयंपाकघरात एआयवर बंदी का घालता येत नाही?

गेल्या आठवड्यात हैदराबाद येथे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एक महत्त्वाचे विधान केले. विधी शिक्षणात जनरेटिव्ह एआयवर बंदी घालणे ‘ना व्यावहारिक आहे, ना शहाणपणाचे’, असे ते म्हणाले. त्यांनी मांडलेले हे वास्तव केवळ न्यायालये आणि विधी महाविद्यालयांपुरतेच मर्यादित नाही, तर त्याचे अर्थ त्यापलीकडे जाणारे आहेत. एआयची लाट रोखण्याचा प्रयत्न करणे म्हणजे झाडूने समुद्र अडवण्यासारखे आहे. कायदेशीर कागदपत्रांचा मसुदा तयार करणे असो वा रात्रीच्या जेवणासाठी पास्ता उकळणे, एआय आपल्या दैनंदिन जीवनात एकरूप झाले आहे. त्यावर बंदी घातल्याने त्याची प्रगती थांबणार नाही; उलट त्याच्या हाताळणीसाठी आपण तयार होऊ शकणार नाही. ही शांत क्रांती आधुनिक स्वयंपाकघरांत सर्वाधिक प्रकर्षाने दिसून येते. स्वयंपाकघरातील उपकरणांमध्ये एआयचा वाढता वापर मला नुकताच जाणवला, जेव्हा माझ्या 15 वर्षे जुन्या टोस्टरने साथ सोडली. बऱ्याच काळानंतर एका इलेक्ट्रॉनिक दुकानाला दिलेल्या भेटीने मला थक्क केले. पिढ्यान््पिढ्या स्वयंपाक ही सतत लक्ष ठेवण्याची, अंदाज बांधण्याची आणि कधीकधी वाजणाऱ्या स्मोक-अलार्मशी जोडलेली कला राहिली आहे. मात्र, आज साधी स्वयंपाकघरेही अशा बुद्धिमान यंत्रणेत बदलली आहेत, जिथे करपलेले टोस्ट आणि ऊतू जाणारी भांडी ही भूतकाळातील गोष्ट ठरू लागली आहेत. आपल्या घरगुती स्वयंपाकाला नवा आकार देणारी काही उपकरणे पुढीलप्रमाणे आहेत. व्हिजन-इक्विप्ड स्मार्ट ओव्हन: यात लझानिया किंवा ब्रेडचा ट्रे ठेवताच ओव्हन तो पदार्थ ओळखतो. त्याचे वजन पाहून योग्य तापमान आणि वाफेची पातळी ठरवतो. पदार्थाचा रंग अगदी योग्य तपकिरी होताच, त्याच सेकंदाला तो शिजवण्याची प्रक्रिया थांबवतो. ‘प्रो-असिस्ट’मध्ये आता अशा उष्णतारोधक कॅमेऱ्यांची आणि कॉम्प्युटर व्हिजनची सुविधा आहे. सेन्सरवर चालणारे इंडक्शन हॉब्स: बुद्धिमान स्टोव्हटॉप्स आणि इंडक्शन शेगड्या भांड्यांमधील सेन्सरशी थेट संपर्क साधतात. त्याद्वारे त्या त्याच क्षणी भांड्याचे तापमान नियंत्रित करतात. पाणी उकळू लागताच शेगडी आपोआप उष्णता कमी करते. त्यामुळे पास्ता किंवा दूध कधीही ऊतू जात नाही. एआय-आधारित रेफ्रिजरेटर: हे उपकरण मला सर्वाधिक थक्क करते. आता फ्रिजमध्ये गुगल जेमिनीसारखी संवाद साधणारी मॉडेल्स बसवलेली असतात. त्यातील अंतर्गत कॅमेरे फ्रिजमध्ये किराणा सामान ठेवताच त्याची नोंद करतात. ते वस्तूंच्या एक्सपायरी डेटवर लक्ष ठेवतात. तुम्ही दरवाजा किती वेळा उघडता, त्यानुसार आतील आर्द्रता नियंत्रित करतात. जे पदार्थ खराब होण्याआधी वापरणे गरजेचे आहे, त्यापासून रात्रीच्या जेवणाच्या पाककृतीही ते सुचवतात. इतकेच नाही, तर काही रेफ्रिजरेटर आता थेट किराणा दुकानदाराला ऑर्डर देऊ लागले आहेत. तसेच घरमालक सामान घेण्यासाठी घरी असेल, अशीच वेळही ते निश्चित करतात. छोटे काउंटरटॉप सोबती: अगदी लहान गॅझेट्समध्येही आता अल्गोरिदमची जाण आली आहे. ऑप्टिकल आणि वजन मोजणारे सेन्सर असलेले डिजिटल टोस्टर उष्णता नियंत्रित करतात. त्यामुळे ब्रेड करपण्याऐवजी सोनेरी रंगावर भाजून बाहेर येतो. ऑल-इन-वन कुकिंग रोबोट्स, एआय-आधारित एअर फ्रायर, अंदाज बांधणारे वायरलेस थर्मामीटर आणि स्वतःहून अचूकता साधणाऱ्या एस्प्रेसो मशीन्स कुटुंबाची चव ओळखतात. त्या अनेक टप्प्यांच्या पाककृतीही प्रयोगशाळेसारख्या अचूकतेने तयार करतात. जर आपण भीतीपोटी किंवा जुन्या सवयींमुळे एआयला विरोध केला, तर आपण अशा साधनांना मुकू जी अन्नाची नासाडी कमी करतात आणि ऊर्जा वाचवतात. तसेच ती व्यस्त कुटुंबांसाठी आणि दृष्टिहीन किंवा शारीरिकदृष्ट्या अक्षम व्यक्तींसाठी स्वयंपाक सोपा करतात. याउलट, स्वतःची कला न समजून घेता आपण सर्व काही ऑटोमेशनवर सोपवून दिले, तर आपण ती उपजत जाण, सर्जनशीलता आणि आनंद गमावून बसू, जो कोणत्याही अन्नाला खरा आपलेपणा देतो. एआयसोबत जगण्यासाठी अगदी त्याच संतुलनाची गरज आहे, जे सरन्यायाधीशांनी सांगितले: मानवी जबाबदारीसह विचारपूर्वक केलेला वापर. न्यायालयांमध्ये याचा अर्थ असा की, संशोधनाला गती देण्यासाठी एआयचा वापर व्हावा; पण प्रत्येक पूर्वनिर्णयाची तपासणी माणसानेच करावी. त्याचप्रमाणे स्वयंपाकघरात सेन्सरला तापमानावर आणि कॅमेऱ्यांना अन्न शिजण्यावर लक्ष ठेवू द्यावे. मात्र चव, पाहुणचार आणि परंपरेची जबाबदारी आपण स्वतःकडेच ठेवावी. फंडा असा आहे की - एआय हे आता आपल्या दारावर टकटक करणारे कोणतेही भविष्यातील तंत्रज्ञान राहिलेले नाही. ते आधीच आपल्या स्वयंपाकघरात आणि कार्यालयांत पोहोचले आहे. त्यावर बंदी घालणे किंवा त्याच्यापुढे शरण जाणे, हे आपले काम नाही, तर त्याच्यासोबत समंजसपणे काम करायला शिकणे हेच आपले काम आहे.

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *