पवन के. वर्मा यांचा कॉलम:पाश्चिमात्य दृष्टिकोनातूनच साहित्याचे मूल्यमापन का होत राहावे?

यंदाच्या साहित्याच्या नोबेल पारितोषिकासाठी नामांकित लेखकांमध्ये भारताचे ९४ वर्षीय दिग्गज गुलजार यांचाही समावेश होता। शब्दांना सुबकपणे आकार देणारे गुलजार भारतातील घराघरांत परिचित आहेत। अनुवादांच्या माध्यमातून त्यांना जगभरातही सन्मान मिळाला आहे। त्यांच्या लेखनाचा आवाका विस्मयकारक आहे। कविता, चित्रपटगीते, बालसाहित्य, नाटके, कथा, गद्यलेखन आणि पटकथा— त्यांच्या लेखणीने या सर्व साहित्यप्रकारांना समृद्ध केले आहे। त्यांचे वय आणि साहित्याप्रती आयुष्यभराची निष्ठा लक्षात घेता, त्यांच्या साहित्यिक योगदानाचा सन्मान केला गेला असता, तर ते योग्यच ठरले असते। परंतु निर्णायकांनी कॅनेडियन लेखिका ॲन कार्सन यांची निवड केली। निःसंशयपणे, कार्सन भाषाशास्त्राच्या समर्थ विदुषी आहेत; परंतु गुलजार यांच्या विपुल आणि सजीव साहित्यनिर्मितीचे महत्त्वही कमी लेखता येणार नाही। स्वीडनमध्ये बसलेल्या समितीने पाश्चात्त्यांच्या परिचित भाषांच्या सोयीस्कर कक्षेबाहेरील एखादी साहित्यिक प्रतिभा शोधण्याची तसदी घेतली नाही। साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळवणारे शेवटचे आणि एकमेव भारतीय रवींद्रनाथ ठाकूर होते; त्यांना हा सन्मान 1913 मध्ये मिळाला होता. त्यानंतर एका शतकाहून अधिक काळ लोटला आहे. 1.4 अब्ज लोकसंख्या असलेल्या या उपखंडात—जिथे 24 अत्यंत विकसित साहित्यिक भाषा आहेत आणि ज्यांच्या लिखित परंपरा सहस्रावधी वर्षे जुन्या आहेत—या पुरस्कारासाठी पात्र ठरेल असा एकही लेखक झाला नाही, असे आपण खरोखर मानायचे का? स्टॉकहोमची संकुचित दृष्टी आणि संस्थात्मक उपेक्षा यांमुळे गैर-पाश्चात्त्य जगातील ज्या साहित्यिकांना ऐतिहासिकदृष्ट्या या सन्मानापासून वंचित राहावे लागले, त्यांची यादी धक्कादायक आहे. उदाहरणार्थ, अर्जेंटिनाचे होर्हे लुईस बोर्खेस, आफ्रिकेतील चिनुआ अचेबे आणि न्गुगी वा थ्योंगो किंवा सीरियाचे अदूनिस—या सर्वांकडे दुर्लक्ष करण्यात आले. भारतात प्रेमचंद, आर. के. नारायण, वैकम मुहम्मद बशीर आणि महाश्वेता देवी यांसारख्या लेखकांच्या नावांचा कधी विचारही करण्यात आला नाही. अगदी लिओ टॉल्स्टॉयसारख्या दिग्गजालाही या सन्मानापासून वंचित ठेवण्यात आले. एवढ्या चुकांनंतर हा पुरस्कार जागतिक उत्कृष्टतेचा मापदंड कसा ठरू शकतो? सत्य हे आहे की विज्ञानाच्या विषयांना अपवाद मानले, तर उर्वरित क्षेत्रांमध्ये हे पुरस्कार मोठ्या प्रमाणावर युरोपकेंद्री राहिले आहेत—जिथे पश्चिमेचे आक्रमक वर्चस्व आहे आणि निवड मनमानी तसेच पक्षपाती आहे. आकडेवारी स्वतःच वास्तव सांगते. 1901 मध्ये पुरस्काराची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत साहित्यातील 123 नोबेल विजेत्यांपैकी एकट्या फ्रान्सच्या वाट्याला 15 विजेते आले आहेत. या यादीत तो सर्वांत वर आहे. त्याच्या अगदी मागे अमेरिका आणि ब्रिटन आहेत. भाषेच्या आधारे पाहिले, तर इंग्रजीत लिहिणाऱ्या लेखकांना 30 पुरस्कार मिळाले आहेत. त्यानंतर, अपेक्षेप्रमाणे, फ्रेंचला 16, जर्मनला 14 आणि स्पॅनिशला 11 पुरस्कार मिळाले आहेत. या चार पाश्चात्त्य भाषांचा एकत्रित विचार केला, तर साहित्यातील जागतिक नोबेल पुरस्कारांपैकी जवळपास दोन-तृतीयांश पुरस्कार यांच्याच खात्यात गेले आहेत. उर्वरित जगाच्या—ज्यात आशिया, मध्य-पूर्व आणि आफ्रिकेतील प्राचीन संस्कृतींचा समावेश आहे—वाट्याला फारच कमी पुरस्कार आले आहेत. याचे एक कारण असेही आहे की नोबेल पुरस्कारांच्या निवड प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव आहे. निर्णय गुप्ततेच्या आवरणाखाली घेतले जातात आणि ते ना सार्वजनिक छाननीच्या कक्षेत आणले जातात, ना तज्ज्ञांच्या पुनरावलोकनासाठी सादर केले जातात. त्यामुळे पुरस्काराच्या निवडीवर तात्कालिक भूराजकीय हितसंबंधांचा प्रभाव वरचढ होण्याची शक्यता निर्माण होते. नोबेल शांतता पुरस्काराचेच उदाहरण घ्या. आधुनिक काळातील शांततेचे सर्वांत मोठे प्रतीक महात्मा गांधी यांना या पुरस्कारासाठी 14 वेळा नामांकन मिळाले, परंतु त्यांना हा सन्मान मिळाला नाही. याउलट, रिचर्ड निक्सन आणि हेन्री किसिंजर यांना हा पुरस्कार देण्यात आला, जरी व्हिएतनाममध्ये त्यांच्याच कार्यकाळात बॉम्बहल्ले झाले होते. दुर्दैवाने—विशेषतः विकसनशील देशांमध्ये—लोक स्वीडन किंवा नॉर्वेत बसलेल्या निर्णायकांच्या निर्णयांना गरजेपेक्षा जास्त महत्त्व देतात. अनुवादातील अडथळ्याचे कारण पुढे करणे म्हणजे प्रत्यक्षात आपले अपयश स्वीकारणे होय. जर एखादा पुरस्कार स्वतःला जागतिक म्हणवत असेल, तर जगातील साहित्य वाचण्याची-समजून घेण्याची क्षमता विकसित करण्याची जबाबदारी त्या संस्थेची आहे; जगाची ही जबाबदारी नाही की त्याने स्वतःचे युरोपातील एका छोट्याशा अभिजन वर्गाच्या भाषांमध्ये भाषांतर करून घ्यावे. आपल्यालाही आपल्या मूल्यमापनाच्या निकषांना वसाहतवादी प्रभावांपासून मुक्त करावे लागेल. नोबेलच्या दुर्लक्षामुळे आपल्या साहित्याची प्रतिष्ठा अजिबात कमी होत नाही. (ही लेखकाची स्वतःची मते आहेत)

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *