पुणे: दिवेआगर समुद्र दुर्घटना: आळंदीतील 'त्या' ८ मृत विद्यार्थ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; राज्य सरकारकडून ४० लाखांचा निधी मंजूर!

पुणे: रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर सहलीदरम्यान पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालेल्या पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील आठ विद्यार्थ्यांच्या कायदेशीर वारसांना राज्य सरकारकडून मोठा आधार देण्यात आला आहे. मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून (Chief Minister's Relief Fund) या प्रत्येक विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये याप्रमाणे एकूण ४० लाख रुपयांचे अर्थसाहाय्य मंजूर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री सचिवालयाने गुरुवारी (दि. २६ नोव्हेंबर) याबाबतचा अधिकृत आदेश जारी केला असून, मंजूर झालेला संपूर्ण निधी पुढील वितरणासाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आला आहे.

नेमकी दुर्घटना काय घडली होती?

१ ऑक्टोबर २०२६ रोजी पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील ‘विनर्स अकॅडमी’ या खासगी क्लासेसच्या अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची सहल कोकणात गेली होती. या सहलीमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी असा एकूण ४८ जणांचा गट सहभागी झाला होता. रायगड किल्ला पाहून झाल्यानंतर हा गट रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेला होता. समुद्रकिनाऱ्यावर पोहण्याचा आनंद घेत असताना पाण्याची खोली आणि लाटांच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने हे विद्यार्थी खोल पाण्यात ओढले गेले. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने बचावकार्य राबवले, मात्र या हृदयद्रावक घटनेत अवघ्या १६ वर्षे वयोगटातील आठ विद्यार्थ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेमुळे आळंदी परिसरासह संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली होती.

दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या आठ विद्यार्थ्यांची नावे

या दुर्दैवी घटनेत प्राण गमावलेल्या आठ विद्यार्थ्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत:

  1. तन्मय दत्तात्रय वहीले

  2. सुमित भरत अहिरे

  3. प्रणव रामदास बनसोडे

  4. कैवल्य सतीश वासनकर

  5. राजवीर युवराज वहीले

  6. यश किरण वानखेडे

  7. सोहम तुकाराम भांडवलकर

  8. कौस्तुभ संदीप दौंड

मंत्री भरत गोगावले यांचा पाठपुरावा आणि निधी मंजुरी

या भीषण दुर्घटनेनंतर रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री तसेच रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी शोकसंतप्त कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते. तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून या आठही विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत देण्याची विनंती केली होती. या पाठपुराव्याची दखल घेत राज्य शासनाने मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून एकूण ४० लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली असून, लवकरच हा निधी संबंधित मृत विद्यार्थ्यांच्या कायदेशीर वारसांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *